डोंबिवलीमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून या चोरटय़ांच्या हल्ल्यात एक ८० वर्षांची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. माधवी मधुसूदन करंदीकर असे सदर महिलेचे नाव असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोड परिसरातील तुलसीकृपा सोसायटीच्या आवारात ही महिला रात्री फेरफटका मारत होती. फेरफटका मारुन झाल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी सोसायटीच्या गेटजवळ येताच पाठीमागून आलेल्या सोनसाखळी चोराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. अचानक झालेल्या या हल्ल्याने ही महिला खाली पडली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चोरटय़ाच्या हातात केवळ साखळीचा अर्धाच भाग आला असून तो घेऊन त्याने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू
प्रतिनिधी, ठाणे</strong>
ठाणे स्थानकात थांबा नसलेल्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा फलाट आणि गाडीच्या पोकळीत पडून मृत्यू झाला. रामबच्चन फुलचंद यादव (४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो भाइंदर येथील राहणारा होता. बुधवारी, दुपारी १२.४० वाजताच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर ही घटना घडली. जखमी रामबच्चन यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
वाराणसीहून लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात जाणाऱ्या गाडीतून रामबच्चन बुधवारी प्रवास करत होता. या गाडीस ठाणे स्थानकात थांबा नसला तरी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न रामबच्चन याने केला. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे गाडी आणि फलाटाच्या पोकळीमध्ये पडून जखमी झाला. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली.
भिवंडीत पावणेचार लाखांची घरफोडी
भिवंडी : येथील काल्हेर परिसरातील पवनपुत्र रेसिडेन्सीमधील एका घरात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली. घरातील नागरिक बुधवारी सकाळी घराबाहेर पडले असता चोरटय़ांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातून तीन लाख ७१ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये ११ लाखांची घरफोडी
कल्याण : खिडकीतून प्रवेश करुन चोरटय़ांनी ११ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना कल्याण ग्रामीण परिसरात मंगळवारी रात्री घडली आहे. श्रीकृष्णदर्शन बंगल्यात प्रवेश करून ११ लाखांचे दागिने चोरटय़ांनी चोरुन नेले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा फलक लावणाऱ्यांवर कारवाई
उल्हासनगर :अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरोधात उल्हासनगर महापालिकेने कारवाईस सुरुवात केली आहे. कॅम्प नंबर १ मध्ये शिव रोडवर वाढदिवसाचे फलक लावल्याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांनी वेदांत मोरे व स्वरा बाविस्करविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
१५ लाखांचा रेतीसाठा जप्त
भिवंडी : येथील खाडीलगत असलेल्या मौजे भरोडी परिसरात सुरु असलेल्या रेती उपशावर बुधवारी सकाळी महसुल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. खाडी परिसरात कमर खान यांच्या बार्जमधून ही रेती उपसा सुरु होता. या छाप्यात ब्राजवर काम करणारे कामगार वासु मंहोतो व मुबारक शेख हे रेती उपसा करताना आढळून आले. त्यांच्याकडून सेक्शन पंप, पाच ब्रास रेती व एक बार्ज असा एकूण १५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक लाख ७२ हजारांची घरफोडी
ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील जवाहर ज्योती सोसायटीमध्ये घरफोडीची घटना घडली. १ मे पासून बंद असलेल्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश करून घरातून एक लाख ७२ हजारांचा ऐवज चोरला. तसेच त्याच्या समोरच रहाणारे जहांगिर यांच्याही घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.