मंगळसूत्राला हात न लावण्याचे तत्त्व; चौर्यकर्म सहाय्यासाठी पगारी नोकरही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोरीसाठी चोरटे वाट्टेल त्या थरापर्यंत जातात. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर त्यांची नजर असते. मात्र, ठाणे ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरी आणि दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात अटक केलेल्या चोराची गोष्ट काहीशी निराळी आहे. एखाद्या घरात दरोडा टाकताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात घालायचा नाही आणि त्यांच्यासोबत गैरवर्तनही करायचे नाही, असे त्याने मनाशी पक्के केले होते आणि तशा सूचना तो साथीदारांनाही देत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

देवाशीष तारापद बक ऊर्फ आशीष संदीप गुनगुन ऊर्फ आशीष दिवाकर गांगुली (३९) असे या दरोडेखोराचे नाव आहे. मूळचा पश्चिम बंगालचा असलेला देवाशीष टिटवाळा परिसरात राहतो. त्याचा साथीदार शंकर ऊर्फ रमेश कांचन दास (२७) यालाही अटक करण्यात आली असून, तो देवाशीषसोबतच राहतो. देवाशीषने त्याला घरकामासाठी ठेवले होते आणि त्यासाठी त्याला आठ हजार रुपये पगार देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या पथकाने या दोघांना टिटवाळा परिसरातून अटक केली आहे. देवाशीष सुरुवातीला गुन्ह्य़ांची कबुली देत नव्हता. त्याचा साथीदार शंकरला अटक झाल्यानंतर त्याने गुन्ह्य़ांची कबुली दिली, अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी दिली.  टिटवाळा, मुरबाड, कुळगाव, वांगणी, नेरळ, कर्जत तसेच गुजरात राज्यातील घरांमध्ये घुसून शस्त्राचा धाक दाखवत त्याने जबरी चोरी, दरोडय़ाचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याने ठाणे ग्रामीणच्या हद्दीत सहा, रायगड जिल्ह्य़ात तीन, पालघर जिल्ह्य़ात एक आणि गुजरात राज्यात तीन असे एकूण १३ जबरी चोरीचे गुन्हे केले असून त्यापैकी दहा गुन्ह्यांत गोळीबार केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून विदेशी बनावटीची दोन पिस्तुले, दोन गावठी कट्टे, ५१ जिवंत काडतुसे, आवाज करणारी नकली रिव्हॉल्व्हर, एक छऱ्र्याची बंदूक, तीन खंजीर, तीन कोयते, कटावणी, एक कुऱ्हाड, हॅण्डग्लोव्हज, चेहऱ्याचा मास्क व एक मोटारसायकल असा ऐवज जप्त करण्यात आला.

याशिवाय, त्याच्याकडून पोलिसांच्या बेडय़ा जप्त करण्यात आल्या असून या बेडय़ा त्याने गुजरातमध्ये एका पोलिसाच्या घरी केलेल्या घरफोडीतून चोरल्या होत्या, असेही प्रधान यांनी सांगितले.

मी चोर बोलतोय..

२००८ मध्ये कल्याण भागातील एका सराफा दुकानात चोरी केल्यानंतर देवाशीषने दुकान मालकाला फोन केला होता. ‘मी चोर बोलतोय.. तुमच्या दुकानात चोरी केली असून केवळ चांदीचे दागिने चोरले आहेत. आता मी दुकानातून चोरी करून निघालो आहे, पण पाठीमागच्या भिंतीला छिद्र केल्यामुळे तेथून दुसरा चोर आत येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लवकर दुकानात पोहोचा’ असे त्याने त्या मालकाला सांगितले होते.

चोरीचे दागिने खासगी वित्त संस्थेत तारण

देवाशीषकडे वाणिज्य शाखेची पदवी असल्यामुळे त्याला बँक तसेच खासगी वित्त कंपनीतील गुंतवणुकीसंबंधी बरीच माहिती आहे. त्याने चोरलेले दागिने एका खासगी वित्त कंपनीत तारण ठेवले असून, त्याची वेगवेगळ्या सात बँकांमध्ये खाती आहेत. या बँक खात्यांचा तपशील तपासण्यात येत असून, त्याच्याकडे तीन पॅनकार्ड सापडले आहेत. तसेच तो नऊ ते दहा भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत होता, असेही तपासात पुढे आले आहे.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different story of thief in thane
First published on: 10-05-2016 at 03:26 IST