Direct waste fire Solid Waste Management Regulations in Ambernath news ysh 95 | Loksatta

घनकचरा व्यवस्थापनाऐवजी थेट कचऱ्याला ‘अग्नी’; अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी

घनकचरा व्यवस्थापनात सपशेल अपयशी ठरलेल्या अंबरनाथ नगरपालिकेकडून पुन्हा एकदा घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी होताना पाहायला मिळते आहे.

घनकचरा व्यवस्थापनाऐवजी थेट कचऱ्याला ‘अग्नी’; अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

कंत्राटदाराकडून कचरा पेटवण्याचा प्रकार, धुर, दुर्गंधीने नागरिकांना फटका

अंबरनाथः घनकचरा व्यवस्थापनात सपशेल अपयशी ठरलेल्या अंबरनाथ नगरपालिकेकडून पुन्हा एकदा घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी होताना पाहायला मिळते आहे. सर्कस मैदानाच्या मागच्या बाजूस रेल्वे रूळाच्या जवळच कंत्राटदाराकडून कचऱ्याला आग लावली जात असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी लहान कचरा गाड्यांमधून मोठ्या कचरा गाड्यांमध्ये कचरा टाकला जाणे अपेक्षित आहे. मात्र येथे कचरा पेटवून त्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ नगरपालिका घनकचरा व्यवस्थापनात कायमच मागे राहिल्याचे अनेक उदाहरणांवरून समोर आले आहे. मोरिवली भागात असलेल्या बेकायदा कचराभूमीला न्यायालयाच्या दणक्याने नगरपालिकेने हटवण्यात आले. तेथून तो कचरा चिखलोली येथील नागरी वस्तीच्या शेजारीच टाकण्यास सुरूवात करण्यात आली. गेल्या वर्षात सुरू झालेल्या याप्रकाराचे दुष्परिणाम यंदाच्या पावसाळ्यात दिसून आले. कचऱ्यामुळे शेजारच्या गृहसंकुलांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी मिसळले जाऊ लागले. याच कचराभूमीतून निघणारे दुर्गंधीयुक्त दुषीत पाणी शेजारच्या गावांमधील शेतांमध्येही पोहोचले. याविरूद्ध स्थानिकांनी अंबरनाथ नगरपालिकेला थेट राष्ट्रीय हरित लवादात ओढले होते.

हेही वाचा >>> उत्तरप्रदेशातील सराफा व्यापाराची ११ लाख रुपयांची फसवणूक

राष्ट्रीय हरित लवादानेही पालिकेने केलेल्या कृतीवर ताशेरे ओढले होते. मात्र पर्यायी जागा नसल्याने आणि संयुक्त घनकचरा प्रकल्प दृष्टीक्षेपात असल्याने लवादाने येथे कचरा ठेवण्यास मंजुरी दिली. पालिकेकडून या कचराभूमीवर नियमानुसार कार्यवाही सुरू केली. लवादाने फटकारल्यानंतर एका ठिकाणच्या कचराभूमीवर पालिकेने नियम पाळण्यास सुरूवात केली असली तरी घनकचरा वाहतुकीच्या ज्या टप्प्यात कचऱ्याची लहान वाहनातून मोठ्या वाहनात ने-आण केली जाते. त्या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून हा कचरा पेटवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कंत्राटदार येथे कचरा पेटवत असतो. त्यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. त्याबाबत स्थानिकांकडून पालिकेत तक्रारही दिली गेल्याचे समोर आले आहे. एकीकडे पालिका घनकचरा व्यवस्थारपनाचे नियम पाळण्यासाठी प्रयत्न करत असताना कंत्राटदाराच्या या बेजबाबदारपणामुळे पालिका अधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत बुलेट चालकांचा धुमाकूळ, बुलेटच्या धडकेत आजोबा, नातू गंभीर जखमी

रात्री धुराचे साम्राज्य

अंबरनाथ शहरात कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक वायूमुळे आधीच नागरिकांना त्रालासा सामोरे जावे लागते. त्यात या कचऱ्याला आग लावली जात असल्याने सर्कस मैदान, बांगडी गल्ली आणि बी केबिन रस्ता तसेच परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. रात्रीच्या वेळी अंबरनाथ स्थानकावरही धुराची तीव्रता जाणवते.

दररोज रात्री रेल्वेतून प्रवास करताना आणि अंबरनाथ स्थानक तसेच परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. रेल्वे रूळाच्या बाजूलाच हा कचरा पेटवला जातो. हे प्रकार थांबायला हवेत.

-किरण यादव, नागरिक, अंबरनाथ.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:45 IST
Next Story
उत्तरप्रदेशातील सराफा व्यापाराची ११ लाख रुपयांची फसवणूक