संदीप आचार्य, लोकसत्ता
जवळपास गेली दोन वर्ष आरोग्य विभागाचे डॉक्टर जिवाची बाजी लावून करोनाची लढाई लढत असताना राज्य वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीचे कारण सांगत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची वीज गुरुवारी सकाळी कापून टाकली. यावेळी रुग्णालयात जवळपास १००० मनोरुग्ण होते. तसेच ठाणे जिल्ह्यासाठी करोना लसीचे १ लाख ६० हजार डोस व औषध साठा होता. विजेअभावी लस व औषधे वाया जाणार होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही घटना समजताच त्यांनी तात्काळ वीज पुरवठा सुरु करण्याचे आदेश दिले आणि तासाभरातच ठाणे मनोरुग्णालयाचा वीजपुरवठा सुरु झाला. शंभर वर्षाहून जुने असलेले ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय हे हजारो मानसिक आजाराच्या हजारो रुग्णांचे आधारवड आहे. येथे प्रशासकीय इमारतीसह एकूण ७३ इमारती असून यातील चांगल्या अवस्थेत असलेल्या १७ इमारतींमध्ये १००० मनोरुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तसेच येथे आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालय असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे नियमन येथून केले जाते. करोनासाठी आवश्यक असलेली लस तसेच अन्य औषधांचे वितरण येथूनच केले जात असून आजच्या दिवशी येथील औषध विभागात १ लाख ६० हजार लसीच्या मात्रांचा तसेच अन्य औषधांचा साठा शिल्लक होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोरुग्णालयाची २९ लाखांची थकबाकी

राज्य विद्युत विभागाची जवळपास २९ लाख ७ हजार ८४० रुपयांची थकबाकी असल्यामुळे वीज विभागाचे सहाय्यक अभियंता श्रीकांत तावडे यांनी २६ जुलै रोजी मवोरुग्णालयात येऊन २७ जुलैला दुपारी चार वाजेपर्यंत वीजबील न भरल्यास वीज जोडणी कापण्यात येईल असे सांगितले. आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड तसेच सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून परिस्थितीची कल्पना दिली. तसेच तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले. मात्र ही व्यवस्था न झाल्यामुळे वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी २९ जुलै रोजी सव्वा अकराच्या सुमारास ठाणे मनोरुग्णालयाची वीज पुरवठा खंडित केला आणि संपूर्ण रुग्णालय अंधारात गेले.

…आणि अवघ्या तासाभरात वीज जोडणी झाली!

या रुग्णालयात दीड लाखाहून अधिक लस मात्रा, औषध साठा तसेच १००० मनोरुग्ण व अनेक कर्मचारी होते. रुग्णालयातील जनरेटरच्या माध्यमातून आणखी तीन तास वीजपुरवठा सुरु ठेवून लस व औषधे सुरक्षित ठेवता आली असती. मात्र त्यानंतर हा लस साठा नष्ट झाला असता असे येथील डॉक्टरांनी सांगितले. परिस्थितीची माहिती आपण तात्काळ आरोग्य संचालक व वरिष्ठांना कळवली. यावेळी रुग्णालयातील काही डॉक्टरांनी लोकसत्ता प्रतिनिधीशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. यानंतर उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही रुग्णालयाची वीज कापण्यात आल्याचे मान्य केले. तसेच तात्काळ वीजपुरवठा सुरु न झाल्यास लस साठा, औषधे तसेच रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली. सदर प्रतिनिधीने तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही घटना सांगून वीजपुरवठा सुरु करण्याची विनंती केली. तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांनाही माहिती दिली. यानंतर तात्काळ चक्रे फिरली व अवघ्या तासाभरात म्हणजे दुपारी १च्या सुमारास वीज मंडळाचे कर्मचारी आले व ठाणे मनोरुग्णालयाचा खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरु केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीजपुरवठा सुरु होताच त्याची माहिती तात्काळ लोकसत्ता प्रतिनिधीला स्वतः हून कळवली.

..तर अन्य रुग्णालयातही अशीच परिस्थिती उद्भवेल

दरम्यान, आरोग्य विभागाला वित्त विभागाकडून मंजूर करण्यात आलेला निधी कधीच वेळेवर मिळत नसल्याने रुग्णालयांचे सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी यांनाही अनेकदा वेळेवर पगार मिळू शकत नाही, असे येथील डॉक्टरांनी सांगितले. ठाणे मनोरुग्णालयाचे विजेचे मासिक सरासरी बील हे साडेसात लाख रुपये असते तर पाण्याचे सहा महिन्यांचे बिल सात लाख रुपये येते. मागील अनेक महिन्यांपासून रुग्णालयाचे वीजबिल व पाणीपट्टी थकले होते. जवळपास २९ लाख वीजबिल थकले होते तर पाणीपट्टीचे ३ लाख १९ हजार थकले आहेत. ठाणे मनोरुग्णालय प्रशासनाने वार्षिक वीजबिलापोटी ८८ लाख ९७ हजार रुपये तर पाणीपट्टीचे २४ लाख रुपये देण्याचा प्रस्तावही पाठवला होता. मात्र वित्त विभागाने मंजूर अनुदानातील केवळ ३० टक्के रक्कम दिल्यामुळे आरोग्य विभाग अडचणीत सापडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जरी ठाणे मनोरुग्णालयाच्या विजेचा प्रश्न तात्काळ सोडवला असला तरी आरोग्य विभागाला पुरेसा निधी वेळेवर मिळाला नाही तर अशीच परिस्थिती अन्य रुग्णालयात कधीही उद्भवू शकते असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disconnected electricity in thane mental hospital reconnected after cm uddhav thackeray intervene pmw
First published on: 29-07-2021 at 18:51 IST