भगवान मंडलिक

सामाजिक जागृतीच्या दृष्टीने नियमित विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या डोंबिवलीतील एका महिला डाॅक्टरने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून डोंबिवली शहर परिसरात नऊ दिवस व्यसन मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला शाळा चालक, रिक्षा चालक, बस चालक, वाहक, रुग्णालये, नाका कामगार, महिला संघटना यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल

डोंबिवली वुमेन्स वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा डाॅ. स्वाती गाडगीळ यांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून डोंबिवली शहर परिसरात व्यसन मुक्ती अभियान उपक्रम सुरू केले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात उत्सव मंडळे, संघटना विविध उपक्रम राबवून उत्सव आनंदात साजरा करतात. हाच विचार करुन डाॅ. स्वाती गाडगीळ यांनी नवरात्रोत्सव काळातील नऊ दिवसात व्यसन मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार दिवसांपासून त्या डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रिक्षा चालकांना रस्त्याच्या एका बाजुला संघटित करुन त्यांना व्यसने आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती देत आहेत. रिक्षा वाहनतळांवर रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण अधिक असते. अशा सततच्या थुंकण्याने इतरांना काय अपाय होऊ शकतो, याची माहिती डाॅ. गाडगीळ यांनी रिक्षा चालकांना दिली. व्यसन मुक्ती विषयी विविध प्रश्न रिक्षा चालकांनी गाडगीळ यांना विचारले. त्याला त्यांनी समपर्क उत्तरे दिली. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालय, बाजीप्रभू चौक भागात कडोंमपा, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस थांबतात. याठिकाणी गाडगीळ यांनी चालक, वाहक यांना जमा करुन त्यांना मार्गदर्शन केले. डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बळाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशोदा यादव यांच्या सहकार्याने रेल्वे सुरक्षा जवानांना मार्गदर्शन करण्यात आले. याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थी, रुग्णालयातील रुग्ण सेवक यांना व्यसन मुक्तीवर व्याख्यान देण्यात आले.

हेही वाचा >>> पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना

महिला संघटना, बचत गट महिलांशी ऑनलाईन संपर्क करुन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे, असे डाॅ. गाडगीळ यांनी सांगितले. नऊ दिवस हे अभियान सुरू ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने ते पुढे सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.
गेल्या बारा वर्षापासून डाॅ. स्वाती गाडगीळ डोंबिवली शहरासह राज्याच्या विविध भागात थुंकी मुक्ती अभियान राबवित आहेत. गाव, आदिवासी पाड्यांवर जाऊन याविषयी मार्गदर्शन आणि थुंकी मुक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गावोगावचे हे उपक्रम यशस्वी झाले आहेत, असे डाॅ. गाळगीळ यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर, गाव पातळीवर थुंकी मुक्त अभियान राबवून थुंकी मुक्त भारत अभियान यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून व्यसन मुक्ती अभियान सुरू केले आहे. नवरात्रोत्सवापासून सुरू केलेले हे अभियान यापुढेही सुरू ठेवण्याचा विचार आहे. – डाॅ. स्वाती गाडगीळ , अध्यक्षा डोंबिवली विमेन्स वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली