लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली जवळील खोणी गावातील लेकशेअर पलावा वसाहतीमध्ये मंगळवारी सकाळी एका श्वान मालकाने एका वृध्दाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात श्वान मालका विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोककुमार ठठू (७०, रा. लेगसाईड, लेकशोअर, पलावा सिटी, खोणीगाव, डोंबिवली) हे सेवानिवृत्त आहेत. ते दररोज सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडतात. अशोककुमार मंगळवारी सकाळी घराबाहेर पडले. त्यावेळी शेजाऱच्या घरातील एक श्वान मालक आपले दोन श्वान मोकळे सोडून पलावा वसाहतीत फिरत होतात. अशोककुमार यांना मोकळ्या कुत्र्यांची भीती वाटल्याने त्यांनी श्वान मालकाला कुत्र्यांना पट्टे बांधा. नाहीतर ते माझ्या अंगावर धाऊन येतील, असे सांगितले.
आणखी वाचा- फलाटांवरील पंखे सकाळच्या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याने प्रवासी घामाघूम
अशोककुमार यांच्या बोलण्याचा राग आल्याने त्यांचे काहीही ऐकून न घेता श्वान मालकाने त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जवळील चाकू काढून त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले. आणि आता तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली आहे. या अज्ञात इसमाकडून जीवाला धोका निर्माण होणार असल्याने अशोककुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शेजारी राहत असलेल्या अज्ञात श्वान मालका विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.