प्रेयसी आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करत असल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये उघडकीस आलाय. लग्नापूर्वी प्रेयसीला शेवटचे भेटण्याच्या निमित्ताने प्रियकर तिच्या घरी गेला आणि तिथेच हा सारा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> ओला बुकींग, लघुशंका अन् अर्धनग्नावस्थेत सापडलेला मृतदेह; गांजासाठी पैसे हवेत म्हणून प्रवासादरम्यान केली चालकाची हत्या

प्रेयसीला भेटण्यासाठी हा तरुण तिच्या घरी गेला. त्यावेळी त्याने प्रेयसीच्या बेडरूममध्ये जावून नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळून, उशीने नाक तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर त्याच नायलॉनच्या दोरीने स्व:त गळफास घेत बेडरुममध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा सर्व प्रकार डोंबिवलीत घडला असून या प्रकरणामध्ये मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल साळुंखे असे या माथेफिरू प्रियकराचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

नाशिकमधील वडनेर भैरवमध्ये राहणाऱ्या अनिल साळुंखेचे डोंबिवलीतील ललिता काळे या २८ वर्षीय तरुणीबरोबर प्रेम संबध होते. मात्र अनिल हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती ललिताच्या कुटुंबीयांना मिळाल्याने कुटुंबीयांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले होते. काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करत असल्याचे अनिलला सहन झाले नाही. याच रागातून २९ मे रोजी ललिताच्या घरी ती सोडून इतर कोणीही नसल्याचा फायदा घेत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अनिल ललिताला लग्नासाठी शेवटचं भेटण्याच्या निमित्ताने तिच्या घरी आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रागाच्याभरात त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने ललिताचे नाक, तोंड दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याच नायलॉनच्या रस्सीने त्याने स्व:ता पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी ११ वाजता हाका मारूनही बहीण दरवाजा उघडत नसल्याने ललिताच्या बहिनेने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केल्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.