डोंबिवली: आपल्या दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरीला लावतो असे डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील एका रिक्षा चालकाला सांगून त्यांच्याकडून याच भागातील एका इसमाने नोकरी लावण्याच्या बदल्यात सहा लाख रूपये उकळले आहेत. नोकरी नाहीच पण इसम आपले पैसेही परत करत नसल्याने फसवणूक झालेल्या रिक्षा चालकाने बुधवारी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आत्माराम गोविंद पवार (५२) असे फसवणूक झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. ते देवीचापाडा येथील सत्यवान चौक भागात राहतात. तर त्यांची फसवणूक करणारा इसम हा देवीचापाडा येथील रेतीबंदर छेद रस्त्यावरील आनंद दर्शन इमारतीत राहतो. ऑगस्ट २०२० ते जून २०२१ या कालावधीत हा आर्थिक व्यवहार झाला आहे. या प्रकरणी रिक्षा चालक आत्माराम पवार यांनी फसवणूक करणाऱ्या इसमा विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. हा अर्ज विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याच्या मंजुरीसाठी पाठवला होता. या अर्जाला उपायुक्त झेंडे यांनी मंजुरी दिल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी रिक्षा चालक पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षा चालक आत्माराम पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपल्याकडून नोकरीच्या कामासाठी पैसे घेणारा इसम हा आपल्या परिचित आहे. आपल्या दोन्ही मुलांना नोकरीची गरज आहे. त्यांना कोठेतरी नोकरी लागावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. असे एक दिवस रिक्षा चालक आपल्या परिचिताजवळ बोलले. त्यावेळी त्या इसमाने आपली रेल्वेमध्ये ओळख आहे. त्या आधारे आपण तुमच्या दोन्ही मुलांना रेल्वेमध्ये नोकरीला लावू शकतो, असे आश्वासन दिले.
रिक्षा चालकाने फसवणूक करणाऱ्या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ऑगस्ट २०२० पासून रिक्षा चालकाने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारे पैसे, जवळील पुंजीतील असे एकूण सहा लाख रूपये टप्प्याने मुलांना नोकरी लावण्याच्या कामासाठी इसमाकडे जून २०२१ पर्यत दिले.संपूर्ण रक्कम भरणा केल्याशिवाय नोकरी लागण्याच्या प्रक्रिया पूर्ण होणार नाहीत, असे खोटेच इसमाने रिक्षा चालकाला सांगितले होते. त्यामुळे उसनवार, जवळील रक्कम रिक्षा चालकाने इसमाला दिली.
रक्कम देऊन झाल्यानंतर रिक्षा चालकाने इसमाच्या पाठीमागे नोकरीची नियुक्तीपत्रे मिळण्यासाठी तगादा लावला. इसम विविध कारणे देऊन रिक्षा चालकाला नोकरीच्या तगाद्यासाठी थोपवून धरत होता. पैसे देऊन पाच वर्ष होत आली तरी इसम आपल्या मुलांना नोकरी लावत नाहीत. म्हणून चालकाने दिलेले पैसे परत देण्यासाठी तगादा इसमाकडे लावला. त्यालाही इसमाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर इसमाने आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर रिक्षा चालकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल शिनकर याप्रकरणाचा तपास करत आहेत.