डोंबिवली – वाहतूक कोंडी, रस्ते, खड्डे, रस्तोरस्तीचे फेरीवाले, त्यांनी अडवलेले पदपथ, लोकलची गर्दी, रिक्षा चालकांची मनमानी या सगळ्या परिस्थितीत डोंबिवली सुधारण्याचे नाव घेत नाही. सर्व प्रशासकीय यंत्रणा डोंबिवली सुधारण्यासाठी हतबल असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ‘सांग सांग भोलेनाथ, डोंबिवली सुधारेल का?’ असा प्रश्न करत डोंबिवली उंबार्ली भागातील उपक्रमशील विद्यानिकेतन शाळा संस्थेने आपल्या शालेय बसवर एक फलक लावला आहे. हा फलक शहर परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

गेल्या आठवड्यात विद्यानिकेतन शाळा संस्थेने हिंदी सक्ती विषयावरून ‘माय मरो, मावशी जगो,’ असा उपरोधिक फलक शालेय बसवर लावून काही खडे बोल राज्यकर्त्यांना सुनावले होते. आता डोंबिवली शहरातील नागरी समस्या, रोजचीच वाहतूक कोंडी, अरूंद रस्ते, खड्डे, फेरीवाले, लोकल गर्दी, त्यामुळे होणारे मृत्यू, रिक्षा चालकांची मनमानी आणि या सगळ्या विषयावर हातावर घडी तोंडावर बोट ठेऊन नेभळटपणे पाहत बसणाऱ्या डोंबिवलीतील नागरिकांना शालेय बसच्या माध्यमातून आता तरी आत्मचिंतन करा, असे सुचविण्याचा प्रयत्न केला आहे.

डोंबिवली शहराचे विकासाच्या बाबतीत पुढील भविष्य काय असेल, असा प्रश्न शालेय बसवरील फलकावर एक गाॅगलधारी नंदीबैलाला (भोलेनाथ) करण्यात आला आहे. शहराच्या अनेक भागात पावसामुळे खड्डे पडले आहेत. ते खड्डे कधी बुजवले जातील हे प्रशासन यंत्रणांकडून आम्हाला सांंगितले जात नाही, पण करदात्या नागरिकांना हे खड्डे कधी भरले जातील हे भोलनाथ तुम्हीच सांगा, असा प्रश्न फलकावर करण्यात आला आहे.

याशिवाय गाॅगलधारी भोलेनाथाला पुढील प्रश्न विचारण्यात आले आहेत. कचराकुंड्या साफ होऊन नागरिकांचे आरोग्य सुधारले का. फेरीवाले कायमचे हटून पदपथ नागरिकांना चालायला मिळतील का, रस्ते वाहतुकीला मोकळे होतील का. रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्याची शक्यता आहे की नाही. सामान्य, महिलांसाठी लोकलची संख्या वाढून प्रवाशांना समाधानाने प्रवास करता येईल की नाही. लोकल गर्दीमुळे होणारे अपघात कमी होण्याची शक्यता आहे की नाही. महापालिकेची डोंबिवलीतील रेल्वे स्थानकालगतची धोकादायक इमारत तोडून तेथे अद्ययावत प्रशासकीय, नागरी सुविधांचे संकुल उभे राहील का.

वाहन चालक विशेषता दुचाकी स्वार वाहतुकीचे नियम पाळतील का. पालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. इच्छुक उमेदवार वह्या, सौंदर्यप्रसाधने वाटप, घरगुती वस्तू वाटप, सणाला तांदूळ, रवा, मैदा, साखर वाटप करतीलच, पण, हेच लोक नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लोकांची नागरी विकासाची कामे करतील का. आणि या सर्व समस्यांनी ग्रस्त डोंबिवलीतील नागरिक कधीतरी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी नेभळट स्वभाव सोडून रस्त्यावर उतरतील का, असे प्रश्न शालेय बसवर संस्थेने उपस्थित केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना नेआण करण्यासाठी विद्यानिकेतन शाळेच्या बस डोंबिवलीत धावू लागल्या की नागरिकांची भोलेनाथचा उपरोधिक फलक वाचण्यासाठी गर्दी होत आहे.