डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील सर्वाधिक वर्दळीचा अरूंंद नेहरू रस्ता सीमेंट काँक्रीटच्या कामासाठी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे. नेहरू रस्त्यावरून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जाण्याची सूचना पालिका प्रशासनाने केली आहे. डोंबिवलीत शासन निधीतून, एमएमआरडीएच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत.

याच निधीतून नेहरू रस्त्याचे सीमेंट काँक्रीटकरणाचे काम ठेकेदाराने हाती घेतले आहे. मागील वर्षभरापासून पालिकेकडून नेहरू रस्ता, फडके रस्त्यालगतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले. आता मुख्य वर्दळीच्या नेहरू रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम ठेकेदाराने दोन दिवसांपासून सुरू केले आहे. या कामामुळे नेहरू रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. या रस्त्याचे रूंदीकरण न करता, या रस्त्यावरील झाडांना कोणतेही संरक्षण न देता सीमेंट रस्ते काम सुरू करण्यात आल्याने परिसरातील रहिवासी, पर्यावरणप्रेमी नागरिक, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. अतिशय धसमुसळेपणा करत, कोणतेही नियोजन न करता डोंबिवली, कल्याण शहरातील सीमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत, अशी तक्रार गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे डोंबिवलीतील जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. या सीमेंट रस्ते कामांच्या दर्जा, गुणवत्ता याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नेहरू रस्त्यावरील पारशिवनीकर कपडा दुकान आणि जवाहिऱ्यांच्या दुकानासमोरील सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे वाहन चालकांना रेल्वे स्थानकाककडे जाण्यासाठी बापूसाहेब फडके रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. ठाकुर्ली, पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी, ९० फुटी रस्ता, चोळे भागातील प्रवासी रिक्षेने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात येतात. या प्रवाशांना रिक्षेने आता फडके रस्ता, चिमणी गल्ली किंवा बाजीप्रभू चौकात उतरून मग डोंबिवली रेल्वे स्थानकात काही दिवस जावे लागणार आहे.

मानपाडा रस्ता, के. बी. विरा शाळेकडून येणारी वाहने नेहरू रस्त्याने स. वा. जोशी शाळेवरून डोंबिवली पश्चिमेत किंवा ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता भागात जातात. या वाहन चालकांनाही आता फडके रस्त्याने इच्छित स्थळी जावे लागत आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळावरील रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूक करताना प्रवासी घेऊन चिमणी गल्ली किंवा विरा शाळा छेद गल्लीतून फडके रस्त्याने इच्छित स्थळी जावे लागत आहे. या उलटसुलट मार्गिकांमुळे फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ल्यांमध्ये दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडी होत आहे. याठिकाणी सकाळ, संध्याकाळ वाहतूक पोलीस तैनात ठेवण्याची नागरिकांची मागणी आहे.

कोल्हापुरे चौकात कोंडी

महात्मा फुले रस्ता आणि सुभाषचंद्र बोस रस्त्या दरम्यान सर्वाधिक वर्दळीची अरूंद गल्ली ठेकेदाराने काँक्रीट कामासाठी गेल्या आठवड्यात खोदली आहे. डोंबिवली पूर्व भागातून येणारे वाहन चालक या रस्त्याने नवापाडा, गणेशनगर, चिंचोड्याचापाडा, राजूनगर भागात जातात. त्यांना वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागते.