डोंबिवली – खासगी शिकवणी वर्गावरून घरी जात असलेल्या आपल्या मित्राच्या बहिणीची छेड काढली. या विषयावरून दावडी आणि सोनारपाडा येथील दोन तरूणांच्या गटात जोरदार हाणामारीची घटना झाली आहे. यामध्ये एक जण डोक्याला हातामधील स्टीलचा कडा लागल्याने जखमी झाला आहे.
सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डोंबिवली पूर्वीतील ललित काटा परिसरातील सोनारपाडा भागात हा छेडछाडीचा प्रकार घडला आहे. या हाणामारी प्रकरणी सोनारपाडा तलाव भागात राहणाऱ्या जितू हनुमान पाटील (२७) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जितू हे विद्युत तारतंत्रीची कामे करतात. या छेडछाडप्रकरणी जितू पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दावडी येथील एका तरूणा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जितू पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपल्या एका मित्राची बहिण ही सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान एकटीच पायी घरी चालली होती. यावेळी एक तरूण तरूणीची विशिष्ट इशारे, हावभाव करून छेडछाड करत होता. हा प्रकार समजल्यावर तक्रारदार यांनी छेडछाड करणाऱ्या तरूणाला रस्त्यात गाठले आणि त्याला आपल्या मित्राच्या बहिणीची छेडछाड कशासाठी करतो. तिला तुम्ही खासगी शिकवणी वर्गाला जाताना त्रास का देता असे प्रश्न उपस्थित केले.
यावेळी संबंधित तरूण निरुत्तर झाला. यावेळी त्या तरूणा सोबत असलेल्या दावडी भागात राहत असलेल्या तरूणाने तुम्ही आम्हाला असे प्रश्न का करता असे प्रश्न करून तक्रारदार आणि त्यांच्या साथीदारांसोबत वाद उकरून काढला. त्यांची शाब्दीक बाचाबाची वाढत गेली. दोन्ही गट हमरीतुमरीवर आले.
यावेळी प्रतिवादी तरूणाने तक्रारदार आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत ठोशा बुक्क्यांनी अचानक मारहाण सुरू केली. तक्रारदाराने तरूण आणि त्याच्या साथीदाराला समजविण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी गुन्हा दाखल तरूणाने आपल्या हातामधील धार असलेला कडा जोराने तक्रारदाराच्या डोक्यात मारला. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यावेळी दोन्ही गटात जोरदार झटापटी झाली.
तक्रारदार पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी घडल्या प्रकाराबाबत मानपाडा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडल्या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार याप्रकरणाचा तपास करत आहेत.