डोंबिवली – दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदी करून घरी परतणाऱ्या आपल्याच घरातील सख्या भावाला इतर दोन भावांनी बेदम मारहाण केली. पतीला मारहाण होते म्हणून मध्यस्थी करण्यासाठी गर्भवती पत्नी मध्ये पडली. पण संतप्त झालेल्या दोन्ही भावांनी गर्भवती असलेल्या आपल्या वहिनीला धक्काबुक्की केली आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून टाकले आणि तिला शिवीगाळ केली.
तीन भावांमधील या मारहाण प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत तुळशीराम पाटील (३७) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील गोळवली गावातील महाळुबाई बंगला येथे चिंधी गल्लीजवळ राहतात. भरत पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भरतचे सख्खे भाऊ सिताराम तुळशीराम पाटील, नितीन तुळशीराम पाटील यांच्या विरूध्द गु्न्हे दाखल केले आहेत.
गोळवतील राहत्या घराच्या समोर हा मारहाणीचा प्रकार मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. भरत पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे, की दिवाळी निमित्त आपण मंगळवारी पत्नीसह खरेदीसाठी डोंबिवली शहरात गेलो होतो. दिवाळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करून आम्ही दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान गोळवलीतील आमच्या घरी पोहचलो. घरी पोहचल्यावर आपण घरात पत्नीसह जाण्याच्या तयारीत होतो. त्यावेळी तेथे माझा सख्खा भाऊ सिताराम आला.
त्यांनी काही कारण नसताना अचानक माझ्या कानशिलात मारली. मी काही केले नसताना मला का मारले असा प्रश्न आपण भावाला केला. त्याने काहीही ऐकले नाही. मी सितारामशी बोलत असताना माझा दुसरा भाऊ नितीन पाटील हातात बांबूची काठी घेऊन माझ्या दिशेने धावत आला. त्याने मला काही कळण्याच्या आत माझ्या सर्वांगावर बांबूचे फटके मारले. सिताराम याने हातात दगडी घेऊन आपणास मारहाण सुरू केली. एकावेळी दोन्ही भाऊ आपणास मारहाण करत होते. सिताराम याने कोणत्या तरी वस्तुने माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याचे नख उपटून काढले. त्यामुळे मला असह्य वेदना झाल्या.
मला मारहाण होत असताना माझी पत्नी मला या दोन भावांच्या मारहाणीतून सोडविण्यासाठी मध्ये पडली. त्यावेळी माझी पत्नी गर्भवती आहे हे माहिती असुनही नितीन आणि सिताराम यांनी तिलाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच, दोघांनी मिळून पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून टाकले. मला मारण्याची धमकी दिली आहे. या दोघांनी आपणास बेदम मारहाण करून दुखापत केली आहे म्हणून आपण ही तक्रार करत आहोत, असे भरत पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ बनसोडे तपास करत आहेत.
