तीन महिने कोसळत असलेला पाऊस, मुसळधार पावसाच्या माऱ्याने रेल्वे स्थानकांवरील छते अनेक ठिकाणी खराब झाली आहेत. खराब झालेल्या छतांच्या भागातून पाऊस सुरू झाला की पावसाचे पाणी स्थानकात पडत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. डोंबिवली, कल्याण, आसनगाव रेल्वे स्थानकांमधील फलाटांवर पाऊस सुरू झाला की कोसळधार पाहण्यास मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील जनावरांचा बाजार आणि शर्यती बंद ; जिल्ह्यातील लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

रेल्वे स्थानकांमधील फलाटांवर पावसाची गळती सुरू आहे, ही माहिती स्थानक व्यवस्थापकांनी रेल्वेच्या बांधकाम विभागाला कळविली आहे. परंतु, सततच्या पावसामुळे छतांवर शेवाळ आले आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी तात्काळ त्या ठिकाणी कामगार पाठवून दुरुस्ती करणे शक्य नाही. पाऊस कमी झाल्यानंतर ही कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. आता पावसाचे स्थानकात पडणारे पाणी तात्पुरत्या स्वरुपात रोखता येईल का याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती रेल्वेच्या बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> बदलापूर : पंधरवड्यातच महिनाभराचा पाऊस ; सप्टेंबरची सरासरी ओलांडली, सलग दुसऱ्या वर्षात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

डोंबिवली रेल्वे स्थानकात पश्चिम भागातून जिन्याने रेल्वे स्थानकात येत असताना मधल्या स्कायवाॅकच्या कोपऱ्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला की पावसाचे पाणी जिन्यांवर कोसळते. या भागातून येजा करताना प्रवाशांना वळसा घेऊन स्कायवाॅकवर आणि तेथून स्थानकात जावे लागते. डोंबिवली स्थानकातील फलाट एक ए वर कल्याण बाजुकडील जिन्याकडे जाताना १० फुटाच्या अंतरात छत नसल्याने प्रवाशांना पावसात भिजत जाऊन जिन्यावर जावे लागते. अशीच कृती जिन्यावरुन उतरणाऱ्याला प्रवाशाला करावी लागते. या गडबडीत प्रवासी पाय घसरून पडण्याची स्थिती या ठिकाणी आहे. लोकल आल्यानंतर छत नसलेल्या भागात लोकलच्या डब्यात चढणाऱ्या प्रवाशांना पावसात भिजत गडबडीत डब्यात चढावे लागते. अशी माहिती प्रवाशांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच ते सातवर लांबपल्ल्याच्या गाड्या, जलद गती लोकल धावत असतात. या फलाटांवरील स्कायवाॅक आणि छताच्या काही सांध्यांवरुन पावसाचे पाणी फलाटांवर कोसळत आहे. पावसाचा जोर अधिक असेल तर फलाटावर ओहण तयार होते. या जलधारा सुरू असताना एक्सप्रेस, लोकल आली तर प्रवाशांना फलाटावरील जलधारांमधून भिजत जाऊन गाडी पकडावी लागते.आसनगाव रेल्वे स्थानकात छताचा काही भाग खराब झाल्यामुळे पावसाचे पाणी फलाटावर पडते. पाऊस सुरू असेल तर प्रवाशांना छत्री उघडून फलाटांवरुन येजा करावी लागते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या. रेल्वे प्रवासी संघटनांनी हे विषय रेल्वेच्या वरिष्ठांकडे लेखी निेवेदनाव्दारे कळविले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli kalyan asangaon railway stations rain water from the roof directly onto the platforms amy
First published on: 16-09-2022 at 13:37 IST