डोंबिवली – गणेशोत्सवानिमित्त डोंबिवली व कल्याण परिसरात घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत दीड दिवसांच्या विसर्जन केलेल्या एकूण ५२८८ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. डोंबिवलीतील बंदिस्त क्रीडागृहामध्ये मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी एकूण ३४६३ गणेशमूर्ती जमा झाल्या. गणेशोत्सवापूर्वी डोंबिवलीतील विविध शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि सामाजिक संस्थांमध्ये शाडू माती पासून गणपती मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पर्यावरण दक्षता मंडळ आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी या उपक्रमात भाग घेतला.
अत्रे मंदिर कडोमपा शाळा – ४००, विद्यार्थी बंदिस्त क्रीडागृह कडेमपा – ४६५७, सहभागीगणेश मंदिर परिसर – २५ रीजन्सी इस्टेट, बिर्ला नाईट कॉलेज – ३५, बिर्ला डे कॉलेज – ३०, शिवसेना शाखा – ४५ या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन आणि मूर्ती संकलन या विषयांवर कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात आली. गुरुवारी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनात कल्याण परिसरातूनह शाडूच्या १८२५ गणेशमूर्तींचे, डोंबिवली मधून ३४६३ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. अशा प्रकारे डोंबिवली व कल्याण परिसरातील एकत्रित ५२८८ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन करून शाडू मातीच्या मूर्तींचे वैज्ञानिक पद्धतीने विसर्जन, मूर्तींची पुनर्वापरयोग्यता, पर्यावरण संवर्धन यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश साधण्यात आला, अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.
महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साकारलेला हा उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्याचे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.
गणेशोत्सवापूर्वी डोंबिवली महापालिका हद्दीत पर्यावरण स्नेही गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रशासन, पर्यावरण प्रेमी संस्था यांनी खूप प्रयत्न केले. शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळा घेतल्या. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. – रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग.