डोंबिवली – डोंबिवलीत राहत असलेल्या आणि मंत्रालयात कंत्राटी शिपाई म्हणून काम करणाऱ्या देशाविषयी अतीव प्रेम असलेल्या एका देशभक्त तरूणाला त्याची देशभक्ती चांगलीच अंगलट आली आणि त्याला पोलीस कोठडीची नंतर न्यायालयाच्या आदेशावरून तुरूंगाची हवा खावी लागली. या तरूणाला देशासाठी एक लढवय्या ग्रुप (फायटर क्लब) डोंबिवलीतील भाषाप्रभू पु. भा. भावे सभागृहात गुप्तपणे सुरू करायचा होता. या क्लबची पूर्वचाचणी म्हणून या तरूणाने भावे सभागृहातील तलाठी कार्यालयाचे कुलूप सुट्टीच्या दिवशी तोडून तेथे नवीन कुलूप बसवले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा महसूल अधिकाऱ्यांकडून दाखल होताच विष्णुनगर पोलिसांनी कौशल्याने देशभक्त तरूणाला अटक केली.
विक्रम प्रधान असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मंत्रालयात कंत्राटी शिपाई म्हणून काम करतो. विक्रमला भारत देशाविषयी अतीव प्रेम आहे. देशासाठी चांगले काही करावे म्हणून विक्रमने तरूणांचा एक गुप्त लढवय्या ग्रुप (फायटर) तयार करण्याचे ठरविले. गुप्तहेरासारखे प्रशिक्षण तो आपल्या गटातील तरूणांना देणार होता. याचा पहिला चाचणी प्रयोग म्हणून विक्रम प्रधान याने स्वताच पुढाकार घेऊन गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील भावे सभागृहातील पहिल्या माळ्यावरील तलाठी कार्यालयाचे कुलूप एका चावी बनवून देणाऱ्या विक्रेत्याच्या साहाय्याने तोडून तेथे नवीन कुलूप बसवून घेतले. हे करताना त्याने आपण मंत्रालयातील कर्मचारी असल्याचे विक्रेत्याला सांगितले.
सोमवारी सकाळी तलाठी कार्यालयातील मंडल अधिकारी रवींद्र जमदरे तलाठी कार्यालयात आले. त्यांना कार्यालयाला जुने कुलूप तोडून नवीन कुलूप लावले असल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने कार्यालयातील काही महत्वाची जमीनविषयक कागदपत्रे चोरून नेली असावीत असा संशय घेऊन विष्णुनगर पोलीस ठाण्यात जमदरेंनी तक्रार केली. सरकारी कार्यालयातील चोरी असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलिसांनी भावे सभागृह परिसरातील चावी बनवून देणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेतला. तेव्हा एका चावी बनवून देणाऱ्या विक्रेत्याने सांगितले, की मी बाहेर होतो. आपला भाऊ चावी बनवून देण्याच्या दुकानात होता. त्यावेळेस आपल्याने भावाने भावे सभागृहातील तलाठी कार्यालयाचे कुलूप बदलण्यासाठी एका व्यक्तिला चावी बनवून दिली असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्या भावाकडे चौकशी केली. त्याने सांगितले, विक्रम प्रधान नावाची व्यक्ती आपल्या दुकानात आली. त्याने आपणास मंत्रालयात कामाला असल्याचे ओळखपत्र दाखविले. तलाठी कार्यालयाचे कुलूप उघडून देण्यासाठी आपली मदत घेतली. या बदल्यात केल्या कामाचे आपणास विक्रम यांनी ऑनलाईन माध्यमातून ३८० रूपये अदा केले. पोलिसांनी चावी विक्रेत्याच्या डिजिटल व्यवहाराची माहिती घेतली आणि त्या माध्यमातून विक्रम प्रधानचे बँक खाते आणि त्याचा पत्ता शोधून काढला. त्याला अटक केली.
विक्रमने पोलिसांना सांगितले, आपण वाचनप्रेमी आहोत. आपण देशभक्त आहोत. देशासाठी काही करावे म्हणून आपण एक लढवय्या ग्रुप तयार करणार होतो. यासाठी एका गुप्त जागेची गरज होती. यासाठी इतर जागांपेक्षा भावे सभागृहातील तलाठी कार्यालयाची जागा योग्य वाटली. या ठिकाणी आपणास फायटर क्लब सुरू करायचा होता. हा देशभक्तीचा प्रकार ऐकून पोलीस आवाक झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.