कल्याण – आपल्या अल्पवयीन १५ वर्षाच्या बहिणीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा लैंगिक छळ करणाऱ्या डोंबिवलीतील अत्याचारी भावाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर यांनी दहा वर्ष तुरूंगवास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
२०१५ मध्ये ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार त्यावेळी २२ वर्ष वय असलेल्या (आता वय ३२) भावाने केला होता. पीडित मुलगी आपल्या एका भावाच्या शेजारी राहत होती. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. कदंबिनी खंडागळे, आरोपी तरूणातर्फे ॲड. रश्मी भंडारकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
ॲड. खंडागळे यांनी न्यायालयात सांगितले, पीडित मुलगी आणि आरोपी हे बहिण भाऊ आहेत. भाऊ बहिणीच्या घराशेजारी राहत होता. ऑगस्ट २०१५ मध्ये पीडित मुलगी एक दिवस घरात एकटीच होती. त्यावेळी तिचा भाऊ रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान तिच्या घरी आला. मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान त्याने पीडितेवर जबरदस्ती केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.cअचानक घडलेल्या या प्रकाराने पीडिता घाबरली. तिला याविषयी कोठेही न बोलण्याची धमकी आरोपीने दिली.
या घटनेनंतर सप्टेंबरमध्ये पीडिता घरात एकटी असताना पुन्हा तिच्या शेजारी राहत असलेला भाऊ पीडितेच्या घरी आला. त्याने जबरदस्ती करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने त्याला प्रतिकार केला. मी तुझी बहिण आहे, असे सांगून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पीडिता जोराने ओरडू लागली तर आरोपीने घरातील दूरचित्रवाणीचा आवाज मोठा केला. हा प्रकार आपल्या मोठ्या बहिणीला सांगेणे त्यावरही तो काही बोलला नाही. पीडिता शरीर संबंधाला प्रतिकार करत असल्याचे दिसताच आरोपीने स्वयंपाक घरातून चाकू आणून पीडितेच्या पोटाला लावून मारण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेच्या पोटाला लहानशी जखम झाली.
भावाच्या या अत्याचारी त्रासाने पीडिता त्रस्त होती. तिने हा प्रकार आपल्या मित्राला सांगितला. मित्र आणि तिच्या वडिलांनी पीडितेला याविषयी न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी तिला पाठबळ दिले. पीडितेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली होती.
आरोपी तरूणाच्यावतीने ॲड. रश्मी भांडारकर यांनी जोरदार प्रतिवाद केला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि पीडित बहिणीची साक्ष ग्राह्य धरून प्रतिवादाचे सर्व दावे फेटाळून लावले. आपण तुझी बहिण आहोत हे अल्पवयीन पीडिता सज्ञान असलेल्या आरोपीला सांगत असताना आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले आहे. त्यामुळे तो या गुन्ह्यातील शिक्षेला पात्र आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालायने आरोपीला दहा वर्ष तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली.
आरोपीला ठोठावलेला पाच हजार रूपये दंड पीडितेला देण्याचे आदेश दिले. याशिवाय शासनाच्या पीडितांविषयी असलेल्या मनोधैर्यसारख्या योजनांचा पीडितेला लाभ मिळवून देण्याची सूचना न्यायालयाने विधी व सेवा प्राधिकरणाला केली. अन्य एका कलमाखाली न्यायालयाने आरोपीला एक वर्ष तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली.