कल्याण- शाळांना सुट्टी असल्याने डोंबिवलीतील दोन अल्पवयीन मुले पालकांची नजर चुकवून लोकलने शहाड रेल्वे स्थानकात लोकलने पोहचली. स्थानकात लोकल येत असतानाच ही मुले धावती लोकल पकडून थांबण्यापूर्वीच फलाटावर उड्या मारून थरारक जीवघेणी कृती करत होती. ही प्रवासी मुले नसल्याचे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी या मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य परिमंडळ महिला सुरक्षा पथक अंतर्गत मुंबई गुन्हे शाखा लोहमार्ग पोलिसांचे एक पथक शहाड रेल्वे स्थानकात मंगळवारी गस्तीवर होते. या पथकात महिला हवालदार के. पी. इंगवले, हवालदार सी. बी. माने, ई. डी. डबडे होते. त्यांना १४ व १५ वर्षाची दोन अल्पवयीन मुले रेल्वे स्थानकात प्रवासी म्हणून आली असे सुरुवातीला वाटले. ही दोन्ही मुले शहाड रेल्वे स्थानकात टिटवाळाकडून लोकल आली की धावती लोकल पकडून लोकल स्थानकात थांबत असतानाच उडी मारुन फलाटावर उड्या मारत होती. अशाप्रकारे दोन ते तीन लोकलमध्ये या अल्पवयीन मुलांनी हा प्रकार केला.
ही मुले स्थानकात प्रवासी म्हणून आली नसून ती स्टंटबाजी करत असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी लोकलमधून स्टंटबाजी करत मुले उतरल्यावर त्यांना तुम्ही कोठे जाणार आहेत. तुमच्या जवळ रेल्वे तिकिटे आहेत का, अशी विचारणा केली. ही मुले पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील फलकांवर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख, छबीतून बाळासाहेब थोरात गायब

या मुलांचे पालक या मुलांसोबत नसल्याचे आणि ही मुले डोंबिवलीतून शहाड रेल्वे स्थानकात स्टंटबाजी करण्यासाठी आली आहेत, असे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आले. मुलांकडून त्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक घेतले. पालकांना पोलीस ठाण्यात बोलविल्यावर त्यांना मुले करत असलेल्या स्टंटबाजीची माहिती दिली. मुलांची करामत ऐकून पालक हैराण झाले. पोलिसांनी या दोन्ही मुलांना समज देऊन पालकांच्या ताब्यात दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli minors perform local stunts at shahad railway station amy
First published on: 25-05-2023 at 12:22 IST