डोंबिवली – डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (डीएनएस) आपल्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. बँकेने आपले अधिकृत युपीआय हँडल @okdnsbank लाँच केले आहे. या उपक्रमामुळे डीएनएस बँक भारतातील काही निवडक सहकारी बँकांच्या समुहात सामील झाली आहे, ज्यांनी स्वतःचे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा सुरू केल्या आहेत.

Vega, The Payment Switch या Getepay द्वारे विकसित केलेल्या प्रणालीच्या साहाय्याने ही घोषणा ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२५ मध्ये डीएनएस बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य, पदाधिकारी आणि Getepay चे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी डीएनएस बँकेचे संचालक मिलिंद अरोलकर म्हणाले, “हा क्षण केवळ डीएनएस बँकेसाठीच नव्हे तर संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी परिवर्तन घडवणारा आहे. आमचे उद्दिष्ट सुरक्षित, आधुनिक आणि सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग सेवा प्रत्येक समाजघटकापर्यंत पोहोचवणे आणि इतर सहकारी बँकांना या वाटेवर प्रेरित करणे आहे.”

Getepay चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा यांनी सांगितले, “डीएनएस बँकेसोबत ‘Vega – The Payment Switch’ द्वारे भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. या माध्यमातून आम्ही सहकारी आणि प्रादेशिक बँकांना भविष्यासाठी तयार आणि विस्तारक्षम पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रदान करत आहोत.” या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे डीएनएस बँकेने सुरक्षित डिजिटल सुविधा, ग्राहकसुलभता आणि आर्थिक सर्वसमावेशकतेच्या दिशेने आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे आणि सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

डीएनएस बँकेतर्फे सर्व सहकारी बँकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी डीएनएस बँकेसोबत भागीदारी करून आपल्या ग्राहकांसाठी क्युआर आधारित पेमेंट सेवा सुरू कराव्यात. @okdnsbank या अधिकृत युपीआय हँडलद्वारे डीएनएस बँकेच्या क्युआर सेवांमध्ये सहभागी व्हावे. सहकाराच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत सुरक्षित डिजिटल सेवा पुरविण्यासाठी डोंबिवली नागरी सहकारी बँक कटीबद्ध आहे, असे संचालकांनी सांगितले.