डोंबिवली – डोंबिवलीतील नवोदित धावपटूंना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या प्रसिध्द धावपटू आणि राष्ट्रीय फूटबाॅलपटूला काही दिवसापूर्वी डोंबिवलीत जीमखाना रस्ता परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका मोटार कार चालकाने फरफटत नेले. या अपघातात या धावपटूचा सायकलवरील मुलगाही जखमी झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने या धावपटूला डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दहा महिने बिछान्याला खिळून राहावे लागणार असल्याने या धावपटूमध्ये अवस्थता आहे.
लक्ष्मण गुंडप असे या धावपटू आणि राष्ट्रीय फूटबाॅलपटूचे नाव आहे. ते डोंबिवलीत कुटुंबीयांसह राहतात. ते डोंबिवलीतील नवोदित, जाणत्या धावपटूंना मोफत प्रशिक्षण देतात. अनेक वर्षांचा त्यांचा सकाळचा हा दैनंदिन उपक्रम आहे. पंधरा दिवसापूर्वी धावपटू गुंडप सकाळच्या वेळेत जीमखाना रस्त्याने आपल्या मुलासह चालले होते. मुलगा सायकलवर आणि लक्ष्मण गुंडप त्याच्या बाजुने दुचाकीवरून चालले होते.
त्यावेळी चुकीच्या मार्गिकेतून उलट दिशेने एक मोटार कार चालक भरधाव वेगात आला. त्याने पहिले गुंडप यांच्या सोळा वर्षाच्या मुलाला जोराची धडक दिली. मुलगा सायकलसह रस्त्यावर पडला आणि जखमी झाला. त्याचवेळी मोटार कार चालकाने धावपटू लक्ष्मण गुंडप यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत गुंडप रस्त्यावर दुचाकीसह पडले. पहिल्या धडकेत मुलगा रस्त्यावर पडला. त्यानंतर लक्ष्मण गुंडप स्वता पडले. दोघांना मोटार कार चालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
मोटार कार चालकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर तो पुढे जाऊन थांबला. या घटनेनंतरही मोटार कार चालक मोकाट असल्याने लक्ष्मण गुंडप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित मोटार कार चालकाला पोलिसांनी अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. गुंडप यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी सुमारे चार ते पाच लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.
प्रसिध्द धावपटूच्या या अपघातामुळे त्यांचे प्रशिक्षक शिष्य मार्गदर्शन बुडाल्याने नाराज आहेत. दहा महिन्याच्या काळात बिछान्याला खिळून राहावे लागणार असल्याने या कालावधीत मुलांना प्रशिक्षण देता येणार नाही, अशी खंत गुंडप यांच्यामध्ये आहे. धावपटू, फूटबाॅलपटू म्हणून लक्ष्मण गुंडप यांनी राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पातळीवर उत्तुंग कामगिरी केली आहे. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. अनेक पदके त्यांनी प्राप्त केली आहेत.