डोंबिवली – डोंबिवली पूर्व पलावा सिटी परिसरातील मलंगगड डोंगर रांगाच्या भागातील नेवाळे चिंचवली शेलारपाडा येथे विनोद बिहारी धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून भव्य हरे कृष्ण मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. श्री श्री राधा विनोद बिहारी जी मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. ठाणे ते टिटवाळा, कल्याण डोंबिवली परिसरात प्रथमच अशा प्रकारच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. बुधवारी अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.
हरे कृष्ण मंदिर मुंबई, नवी मुंबईत आहेत. ठाणे ते कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरात अशाप्रकारचे मंदिर नसल्याने भक्तांना नवी मुंबई, मुंबईत जावे लागत होते. डोंबिवली जवळ हरे कृष्ण मंदिराची उभारणी झाल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. ज्येष्ठ गुरुंच्या उपस्थितीत या मंदिराचे अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भारत देशातील ज्येष्ठ वैष्णव आचार्य ओम विष्णुपाद परमहंस अष्टोत्तरशत श्रीमद त्रिबिक्रम गोस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरे कृष्ण मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मलंगगड परिसरातील डोंंगर रांंगांच्या पायथ्याशी आणि वनराईने नटलेल्या भागात प्रशस्त जागेत पलावा सिटी भागातील शेलारपाडा गावाजवळ या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. अनंत सेवा ट्रस्टच्या माध्यमातून याठिकाणी गोशाळा चालविण्यात येणार आहे. याशिवाय या मंदिर परिसरात लवकरच श्री रुक्मिणी विठ्ठल गोशाळा, श्री वैकुंठ अतिथीशाळा, सेंद्रीय शेती, हरित उर्जा केंद्र, वैदिक संस्कृती आणि शिक्षा व मार्गदर्शन केंद्र, आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. परिसरातील नागरिकांना याआरोग्य केंद्राचा लाभ घेता येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, शहापूर, भिवंडी, मुरबाड, पलावा सिटी, मलंगगड परिसरतील नागरिक, भाविकांसाठी हे केंद्र सामाजिक, अध्यात्मिक, श्रध्दा केंद्र बनविण्याचा निर्धार विनोद बिहारी धर्मादय ट्रस्टने केला आहे. भक्ति प्रदीप आश्रम महाराज हे हरे कृष्ण मंदिराचे अध्यक्ष आहेत. डोंबिवली परिसरात हरे कृष्ण मंदिराची उभारणी करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. बुधवारी मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाला भक्तगण मोठ्या संख्येने आले होते.