डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके रस्त्यावर अनेक दिवसांपासून एका मोटार वाहन मालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला पदपथाला खेटून उभे केले होते. त्यामुळे वाहतुकीत अडथळा येत होता. पादचारी, नागरिक, परिसरातील व्यापारी या वाहनामुळे हैराण होते.
अखेर पालिका, वाहतूक विभागाकडे या बेवारस स्थितीत असलेल्या वाहनाच्या तक्रारी गेल्या. डोंबिवली वाहतूक विभागाने ४८ तासाच्या आत मोटार वाहन मालकाने वाहन हटवावे अन्यथा हे वाहन जप्त करून पालिकेच्या माध्यमातून ते हटविण्याची कारवाई केली जाईल, अशी नोटीस वाहनावर लावली. त्यानंतर काही तासात अनेक दिवसांपासून धुळीने भरलेली ही मोटार मालकाने हटविली.
हे वाहन बापूसाहेब फडके छेद रस्त्यावरील आगरकर रस्त्यावरील एका रहिवाशाचे होते अशी व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे. फडके रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर दुचाकीसह इतर कोणतेही वाहन उभे राहणार नाही याची काळजी डोंबिवली वाहतूक विभागाकडून घेतली जाते.
अशा स्थितीत दिवाळी सणाच्या काळात बापूसाहेब फडके रस्त्यावर माॅर्डन कॅफे हाॅटेलसमोरील भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर एका मोटार वाहन चालकाने आपले वाहन उभे करून ठेवले होते. हे वाहन कधी कोणी उभे करून ठेवले हे स्थानिक व्यापाऱ्यांनाही माहिती नव्हते.
आपल्या दुकानासमोर मोटार उभी असल्याने आणि ग्राहकांना दुकानात येण्यास अडथळा होतो. पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. अशा स्थितीत ही मोटार वर्दळीच्या रस्त्यावर आणून ठेवण्यात आल्याने स्थानिक व्यापारी त्रस्त होते. सततच्या वाहन वर्दळीमुळे या मोटारीवर धुळीचे थर साचले होते. हे वाहन अन्य कोठे गुन्हा करून या भागात सोडले आहे की काय अशीही चर्चा फडके रस्त्यावरील व्यापारी, पादचाऱ्यांमध्ये होती. स्थानिक व्यापारी हे वाहन कोणाचे आहे याचा शोध घेत होते.
दिवाळी सणाच्या काळात फडके रस्त्यावर पाय ठेवण्यास जागा नसते. एवढी तरूणाईची गर्दी या रस्त्यावर असते. बाजारपेठेमुळे हा रस्ता सकाळ, संध्याकाळ गर्दीने फुलून गेलेला दिसतो. अशा गर्दीच्या जागेत ही मोटार उभी करून ठेवण्यात आली होती. या मोटारीचा त्रास असह्य झाल्याने काही जागरूक नागरिक, व्यापाऱ्यांनी यासंदर्भात डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. पाटील यांनी तातडीने या वाहनाची आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली. आणि या वाहनावर एक नोटीस चिकटवली.
मोटार वाहन मालकाला येत्या ४८ तासात मोटार जागेवरून हटवावी अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. तसेच, पालिकेच्या माध्यमातून वाहन उचलून ते जप्ती तळावर नेण्याची तंबी दिली. त्यानंतर काही तासात कोणाला काही न कळता मोटार वाहन मालकाने आपले वाहन फडके रस्त्यावरून हटवले. हे वाहन हटविल्यानंतर त्या खाली कचरा, धूळ साचली होती. पालिका सफाई कामगारांना या भागात स्वच्छता करता येत नव्हती.
