डोंबिवली : मागील काही महिन्याच्या काळात डोंबिवली शहरातील अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते. काहींचे गहाळ झाले होते. अशाप्रकारचे १२ लाख रूपयाहून अधिक किमतीचे ७१ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून संबंधित मोबाईलधारकांना परत केले आहेत. गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये ७२ नागरिकांचे चोरीला गेलेले १३ लाखाचे मोबाईल पोलसांनी संबंधितांना परत केले होते.
मोबाईल चोरी, गहाळ होण्याच्या वाढत्या तक्रारी डोंबिवलीतील रामनगर, विष्णुनगर, मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत दाखल होत होत्या. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी विशेष तपास मोहीम राबवून हे चोरीचे मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्याचे निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे सुनील पवार, मानपाडा पोलीस ठाण्याचे संदीपान शिंदे यांनी विशेष तपास पथके तयार करून मोबाईल चोरीच्या घटनांचा शोध सुरू केला होता.
बहुतांशी मोबाईल चोरीच्या घटना या पादचाऱ्यांच्या हातून मोबाईल चोराने मोबाईल हिसकावून पळून गेल्याच्या होत्या. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिला, पुरूषांच्या पिशवीतून गुपचूप मोबाईल काढून तो चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. बहुतांशी मोबाईल हे महिलांचे चोरीला गेल्याचे पोलीस तपासात आढळले.
मोबाईल चोरल्यानंतर चोर मोबाईल कमी किमतीला गरजू व्यक्तिला विकून निघून जातात. खरेदीदाराला आपण कमी किमतीत घेतलेला मोबाईल चोरीचा आहे याची जाणीव नसते. यापूर्वी अशाप्रकारचे मोबाईल मोबाईल विक्रेते खरेदी करत होते. पण चोरीचे मोबाईल खरेदी केल्यानंतर पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागतात याची जाणीव झाल्यापासून बहुतांशी मोबाईल विक्रेते अशाप्रकारचे मोबाईल खरेदी करत नाहीत.
गेल्या दोन महिन्याच्या काळात चोरी झालेले, गहाळ झालेले मोबाईल पोलीस पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून काढले. रामनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीचे २३ मोबाईल पोलिसांनी विविध ठिकाणांहून हस्तगत केले. विष्णुनगर २४, मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून २४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
डोंबिवलीतील दत्तनगरमधील लेवा भवन येथील एका कार्यक्रमात मोबाईल चोरी, गहाळ झालेल्या ७१ नागरिकांना बोलावून त्यांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.