डोंबिवली – सहा महिन्यापूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील रहिवासी दिवंगत हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी डोंबिवली परिसरातील अनेक नागरिकांनी भारत पाकिस्तान दरम्यान होणारा क्रिकेट सामना न पाहण्याचा निर्धार केला आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक अभिजीत सावंत यांच्यासह अनेक डोंबिवलीकरांचा यामध्ये समावेश आहे.
काश्मीरमधील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेलेल्या विविध भागातील २६ निरपराध पर्यटकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. या दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला असला तरी, पाकिस्तानच्या या नापाक कृतीचा निषेध करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने पाकिस्तानला सनदशीर मार्गाने धडा शिकवण्यासाठी, भारत देशातील सामान्य लोकांची एकजूट दाखविण्यासाठी क्रिकेट सारख्या जाहीर कार्यक्रमावर बहिष्कार घालणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानला लष्कराच्या माध्यमातून तात्काळ योग्य धडा शिकवला. लष्कराने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले. आता सामान्यांनाही पाकिस्तानला आपल्या एकजुटी आणि बळाचे दर्शन घडविण्यासाठी भारतीयांनी भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामान्यावर बहिष्कार घातला पाहिजे, असे ज्येष्ठ शिवसैनिक अभिजीत सावंत यांनी सांगितले.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला. यामध्ये डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय जोशी या तिघांना पर्यटकांनी धर्म विचारून कुटुंबीयांसमोर ठार मारले. याविषयी डोंबिवलीतील नागरिकांमध्ये दहशतवाद्यांविषयी तीव्र संताप आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे हे घडले असल्याने डोंबिवलीतील अनेक राष्ट्रप्रेमाविषयी ज्वाज्वल्य अभिमान असलेल्या अनेक देशभक्त नागरिकांनी भारत पाकिस्तान सामना न पाहण्याचा निर्धार केला आहे.
समाज माध्यमांवर काही जागरूक नागरिकांनी या विषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. धर्म विचारून ज्या दहशतवाद्यांंनी आपल्या माता-भगिनींचे कुंकू पुसले. ज्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सर्व प्रकारचे बळ होते. अशा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे चेहरे आपण का बघावेत, असा भारत पाकिस्तान क्रिकेट न पाहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न आहे. ज्यांच्या रक्त आणि नसांमध्ये दहशतवाद घट्ट पाळेमुळे रोवून बसला आहे. त्यांच्यासाठी आपण आपले काम, धंदा, नोकरीतील वेळ बाजुला काढून क्रिकेट सामान्यासाठी वेळ का फुकट घालवावा, असे प्रश्न काही नागरिकांनी केले आहेत.
पाकिस्तानला भारतीयांची एकजूट दाखविण्यासाठी भारत पाकिस्तान सामान्याकडे भारतीयांनी कशी पाठ फिरवली हे दाखविण्यासाठीची ही एकमेव वेळ आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामान्यावर सनदशीर मार्गाने बहिष्कार टाकावा. तो सामना कोणी पाहू नये, असे अभिजीत सावंत यांनी सांगितले.
पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात डोंबिवलीतील तीन रहिवासी होते. आपल्या जवळील, गावातील तीन रहिवासी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याचे बळी ठरले आहेत. त्याचा निषेध म्हणून भारत पाकिस्तान सामना आपल्यासह अनेक डोंंबिवलीकरांनी न पाहण्याचा निर्धार केला आहे. – अभिजीत सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक.