डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारचे कांदळवन नष्ट करून तेथे बेकायदा बांधकाम करण्यासाठी मातीचा भराव करणाऱ्या अज्ञात भूमाफिया विरुध्द डोंबिवली महसूल विभागाने याप्रकरणाची चौकशी करून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.डोंबिवली विभागाचे मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या निर्देशावरून हा गुन्हा दाखल केला. लोकसत्ता सहदैनिकातील खाडीतील मातीच्या भरावाच्या बातमीचा दाखला आणि महसूल विभागाने केलेल्या पाहणी अहवालाचा आधार घेत विष्णुनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात देवीचापाडा खाडी किनारी माफियांनी खारफुटीची झाडे तोडून मातीचा भराव केला होता. याविषयी लोकसत्ताने वृत्त प्रकाशित केल्यावर महसूल विभागाने याप्रकरणाची चौकशी करून गेल्या वर्षीही अज्ञात भूमाफियांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गु्न्ह्याचा तपास सुरू असताना गेल्या वीस दिवसापूर्वी भूमाफियांनी पावसाळा सुरू झाला आहे. कल्याण डोंबिवली पालिका, महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे आपल्याकडे लक्ष नाही असा विचार करून देवीचापाडा खाडी किनारी खारफुटीची जुनाट झाडे तोडून मातीचा भराव केला होता. हा भराव सपाट करून खाडी किनारा पात्रापर्यंत माती समतल करण्यात आली होती.या बेकायदा माती भरावाचे लोकसत्ताने वृत्त देताच महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या निर्दशावरून निवासी नायब तहसीलदार चव्हाण यांनी एक पर्यावरण संवर्धन पाहणी समिती स्थापन केली. या समितीने देवीचापाडा येथे येऊन माती भरावाची पाहणी केली. या पाहणी पथकाला खाडी किनारची खारफुटीची झाडे तोडून त्या जागेवर भराव करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या पाहणी पथकात साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले, पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी राजेश नांदगावकर, कांदनळवन कक्षाचे वनरक्षक प्रशांत वायाळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. लोखंडे, मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरूण कासार सहभागी झाले होते. कांदळवनाचा ऱ्हास करून हा भराव केल्याने भूमाफिया विरुध्द महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) आणि पर्यावरण अधिनियम १९ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामुळे भूमाफियांची भंबेरी उडाली आहे.
पर्यावरणप्रेमींनी या भागात रोपण केलेली खारफुटीची विविध प्रकारची झाडे माफियांनी भराव करताना तोडून टाकली आहेत, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. या भागातील स्थानिक ग्रामस्थ मात्र खाडी किनारी चांगल्या लोकोपयोगी कामासाठी हा भराव केला जात असताना काही निसर्गप्रेमी नागरिक नाहक या कामात अडथळे आणत आहेत. अशा अडथळे आणणाऱ्या तक्रारदारांना खाडी किनारी बोलावून त्यांचा समाचार घेतला पाहिजे, अशी चर्चा स्थानिक पातळीवर करत आहेत. अशा चर्चा करणाऱ्यांमध्येही मातीचा भराव करणारे दडून बसले असण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींना आहे. पोलिसांनी या चर्चा करणाऱ्या माफियांची चौकशी करावी, अशी मागणी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.