डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागात कल्याण तहसीलदारांच्या विशेष पथकाने अचानक छापा टाकून वाळू माफियांची ३४ लाखाची सामग्री दोन दिवसापूर्वी नष्ट केली. यावेळी वाळू माफियांच्या वाळू उपसा बोटी, वाळू उपशाचे तराफे वेल्डिंग मशिनच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आले. बोटीच्या सांगाड्यांना छिद्रे पाडून बोटी उल्हास खाडीत बुडविण्यात आल्या.
डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर खाडी भागात नियमित रात्री, दिवसा चोरूनलपून वाळू तस्कर वाळू उपसा करतात. ही चोरीची वाळू रात्रीतून विक्री करतात. बहुतांशी वाळू माफियांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे ते महसूल विभागाकडून कितीही कारवाई झाली तरी पुन्हा वाळू उपशासाठी नवीन यंत्रणा तयार करून वाळू उपसा करतात.
मोठागाव रेतीबंदर खाडी भागात काही वाळू माफिया वाळू उपसा करत असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळाली होती. तहसीलदारांच्या आदेशावरून नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांचे एक पथक दोन दिवसापूर्वी अचानक मोठागाव खाडी किनारी दाखल झाले.
त्यांना खाडीत मध्यभागी काही वाळू माफिया तीन बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा करत असल्याचे आढळले. खाडी किनारी पोलीस, वाळू कारवाई पथकाला पाहताच बोटी आणि तराफ्यावरील वाळू माफियांनी खाडी पाण्यात उड्या मारून पोहत भिवंडी बाजुकडील किनारे गाठले. महसूल विभागाच्या पथकाने किनाऱ्यावरील एका बोटीत बसून खाडीच्या मध्यभागी जाऊन वाळू माफियांच्या बोटी, तराफे दोराने खेचत खाडी किनारी आणले. या बोटींमध्ये जमा केलेली वाळू पुन्हा खाडीत ढकलून देण्यात आली. तसेच, बोटींना वेल्डिंग यंत्राच्या माध्यमातून चारही बाजुने छिद्र पाडण्यात आली. या बोटी पुन्हा खाडीत ढकलण्यात आल्या. या बोटींमध्ये खाडीचे पाणी घुसून त्या पाण्यात बुडाल्या. या बोटींवरील डिझेल यंत्र पथकाने मीठ, इंधन टाकून जाळून टाकली.
समोरील खाडी किनाऱ्यावरून वाळू माफिया आपली नष्ट होत असलेली सामग्री पाहत होते. पण त्यांची कारवाईच्या भीतीने विरोधाची हिम्मत होत नव्हती. या कारवाईत वाळू माफियांच्या तीन बोटी, दोन तराफे अशी एकूण ३४ लाखाची सामग्री महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केली. गेल्या वर्षभरात महसूल विभागाने कोपर, मुंब्रा, कल्याण रेतीबंदर भागात वाळू माफियांवर कारवाई करून त्यांची कोट्यवधी रूपयांची सामग्री नष्ट केली आहे.