डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या रामनगर भागात बालभवन समोरील एका इमारतीमधील ८८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाची एका भुरट्या चोरट्याने फसवणूक केली आहे. आपल्या घरातील इंटरनेट जोडणी दुरूस्त करायची आहे असे कारण सांगून हा भुरटा चोर ज्येष्ठ नागरिकाच्या घरात शिरला आणि त्याने ज्येष्ठ नागरिकाला घरातून गरम पाणी करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिक स्वयंपाक घरात जाताच भुरट्याने घरातील पैशाचे पाकिट आणि इतर वस्तू असा एकूण नऊ हजार रूपयांचा ऐवज हातोहात लांबविला. सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.

मागील चार ते पाच महिन्यांपासून डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच प्रकार दोन महिन्यापूर्वी सारस्वत काॅलनी, पेंडसेनगरमध्ये घडले होते. आपण केबल दुरुस्त करण्यासाठी आलो आहोत, असे सांगून भुरट्याने घरातील रोख रक्कम आणि किमती ऐवज घेऊन पलायन केले होते.

डोंबिवली पूर्वेतील रामनगर भागात बालभवन समोरील सुशीला सोसायटीत चिपळूणकर रस्त्यावर भालचंद्र श्रीधर वाळिंबे (८८) हे ज्येष्ठ नागरिक राहतात. ते सेवानिवृत्त आहेत. या चोरीप्रकरणी भालचंद्र वाळिंबे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीत भालचंद्र वाळिंबे यांनी म्हटले आहे की सोमवारी संध्याकाळी आपण घरात होतो. दरवाजावरील घंटा वाजली म्हणून दरवाजा उघडला. त्यावेळी ३० वर्षाचा तरूण दरवाजात उभा होता.

त्या तरूणाने आपणास तुमच्या घरातील इंटरनेटची जोडणी तपासून ती दुरूस्त करायची आहे असे सांगितले. घरात इंटरनेट जोडणी दुरुस्त करणारा तंत्रज्ञ आला आहे म्हणून भालचंद्र वाळिंबे यांनी त्या तरूणाला घरात प्रवेश दिला. त्या तरूणाने भालचंद्र यांच्याशी फार संवाद न साधता थेट घरातील इंटरनेटची जोडणी तपासणीचे काम सुरू केले. हे काम करत असताना त्याने बाजुलाच असलेल्या लॅपटाॅपची पिन तपासली. ही पीन तपासत असताना पीनला गंज चढला आहे. त्यामुळे ती लॅपटाॅपला विजेचा प्रवाह देत नाही असा देखावा निर्माण केला.

त्या पीनचे टोक साफ करण्यासाठी त्या चोरट्याने भालचंद्र वाळिंबे यांना पातल्यात गरम पाणी करण्यास सांगितले. त्या पाण्याच्या माध्यमातून पीन घासली तर ती साफ होईल असे तरूणाने वाळिंबे यांना सांगितले. भालचंद्र स्वयंपाक घरात गरम पाणी करण्यास गेले. त्यानंतर भुरट्या चोरट्याने ओट्यावरील घरातील संगणकाच्या मंचकाचा खण उघडला. त्या खणात नेहमीच्या वापरासाठी ठेवलेली नऊ हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. तसेच बाजुलाच मंचकावर ठेवलेले पैशांचे पाकीट घेऊन पळून गेला.

भालचंद्र वाळिंबे गरम पाणी घेऊन ओट्यावरील खोलीत आले. तेव्हा त्यांना तरूण इसम खोलीत दिसला नाही. त्यांनी घरात, घराच्या बाहेर जाऊन पाहिले तो आढळला नाही. त्यानंतर वाळिंबे यांनी संगणक मंचकाचा खण तपासला. त्यातील नऊ हजाराची रक्कम, पैशाची पाकीट गायब असल्याचे आढळले. तो तरूण पळून गेला होता. घरात आलेला तंत्रज्ञ नव्हता तर तो भुरटा चोर होता, त्याने आपली फसवणूक करून चोरी केली म्हणून भालचंद्र यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.