डोंबिवली – कल्याण शीळ रस्त्यावरील टाटा पाॅवर जवळील गांधीनगर भागात बाबू धर्मू चव्हाण (६०) या वृध्दाचा एमआयडीसीच्या पाणी सोडण्याच्या चेंंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबाला भरपाई मिळावी आणि याप्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही या कुटुंबीयांची मागणी आहे.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले, टाटा पाॅवर नाका येथील गांधीनगर भागातील पाणी सोडण्याचा चेंबर हा बंदिस्त असतो. पाणी सोडण्याच्या वेळेत तो फक्त कामगाराकडून उघडला जातो. पाणी सोडल्यानंतर तो चेंबर पुन्हा लोखंडी झाकणाने बंदिस्त केला जातो. अशाही परिस्थितीत ही दुर्देवी घटना घडली आहे. त्यामुळे याप्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून नक्की ही दुर्घटना कशी घडली याची माहिती घेत आहोत.

टाटा पाॅवर गांधीनगर भागातील रहिवासी आणि मृत बाबू चव्हाण यांचा मुलगा काशिनाथ चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले, माझे वडील रविवारी संध्याकाळी टाटा पाॅवर गांधीनगर भागातून पायी चालले होते. त्यावेळी त्यांचा या भागातील एमआयडीसीच्या उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. पडताना बाबू चव्हाण यांच्या डोक्याच्या पाठमागील बाजुला जोरदार मार बसला. त्यामुळे ते बेशुध्दावस्थेत होते. त्यांना परिसरातील रहिवाशांनी तात्काळ डोंबिवली एमआयडीसीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. परंतु, नंतर त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंंद केल्यानेे त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.

या सर्वस्वी प्रकरणाला एमआयडीसीचा गलथान कारभार कारणीभूत असल्याची टीका परिसरातील रहिवाशांनी केली. हे चेंबर नेहमीच उघडे असते. ते कधीही बंद केले जात नाही, अशी टीका रहिवाशांनी केली. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण कुटुंबीयांनी केली. या भागाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनीही याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. टाटा पाॅवर येथील चेंबर एमआयडीसीचे आहे. तेथे पाणी सोडण्याच्या वेळेत व्हॅाल्व्हमन त्या चेंबरवरील पहिले लोखंडी झाकण काढतो. मग त्या व्हाॅल्व्हच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे काम करतो. चेंबर बंदिस्त असताना ही दुर्घटना घडली कशी याचा तपास आम्ही करत आहोत. परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहोत. दुर्घटना घडली त्यावेळी चेंबरवर झाकण होते का. नसेल तर ते कोणी काढून बाजुला केले होते का याचाही तपास करत आहोत. लवकरच वस्तुस्थिती समोर येईल’, अशी माहिती एमआयडीसी डोंबिवली विभागाचे उप अभियंता औदुंबर अलाट यांनी दिली.