डोंबिवली – ‘मी भाजपचा राजीनामा दिला आहे. मग माझा फोटो भाजपच्या दिवाळी शुभेच्छांच्या फलकावर कशासाठी लावला आहे. तो काढून टाकण्यात यावा,’ अशी सूचना ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना भाजपचे डोंबिवलीतील गरीबाचापाडा प्रभागातील नाराज माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केली होती. विकास म्हात्रे यांच्या या विधानावरून विकास म्हात्रे यांनी शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय पक्का केला असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
गेल्या दोन वर्षापासून भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे गरीबाचापाडा प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळत नाही. रस्ते कामे रखडली आहेत. सुरू असलेली कामे गतीने होत नाहीत म्हणून भाजपमध्ये नाराज आहेत. पक्षाचे स्थानिक नेतृत्व आपणास सहकार्य करत नाही, असा त्यांच्या बोलण्याचा रोख आहे. यापूर्वी दोन वेळा म्हात्रे यांनी सपत्नीक भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडे सोपविला आहे.
वेळोवेळी भाजपने संयमाची भूमिका घेऊन विकास म्हात्रे यांना पक्षात ठेवण्यासाठी गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिन्यापूर्वी तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाराज विकास म्हात्रे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभे करून त्यांची नाराजी दूर केली होती. आता पालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या तशा विकास म्हात्रे शिंदे शिवसेनेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांत दिसू लागले आहेत. शिंदे शिवसेनेतील एक वजनदार विकासपुरूष म्हात्रे यांना खुलेपणाने पक्षात घेण्यासाठी जाळे टाकून आहे.
विकास म्हात्रे हे भाजपमध्ये ‘पाहुणे’ असल्याची आता चर्चा सुरू आहे. दिवाळीनिमित्त भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी गरीबाचापाडा प्रभागात नागरिकांना शुभेच्छा देणारे फलक लावले. त्या फलकावरून विकास म्हात्रे नाराज आहेत. विकास म्हात्रे यांनी थेट भाजप जिल्हाध्यक्षांना फलकावरून जाब विचारल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विकास म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, प्रभागातील फलकांवर भाजपचे कमळ, भाजप प्रदेश, स्थानिक नेते गायब आहेत. त्यामुळे विकास म्हात्रे कोणत्याही क्षणी शिंदे शिवसेनेत जातील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
ही चर्चा सुरू असतानाच बुधवारी रात्री गरीबाचापाडा भागातील श्रीधर म्हात्रे चौकात भाजप स्थानिक पदाधिकारी विजय शिंदे यांनी दिवाळीनिमित्त एका कार्यक्रम आयोजित केला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, महिला संघटक पूजा जोशी, मनोज वैद्य, लारा पटेकर, योगेश भोईर, अनिल भोईर, मेघराज तुपांगे आणि इतर स्थानिक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
कामाच्या व्यस्ततेमुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येऊ शकले नाहीत. भाजपचा हा कार्यक्रम सुरू असताना अचानक तेथे नाराज विकास म्हात्रे आले आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष परब यांच्या जवळ सोफ्यावर बैठक मांडली. हा सगळा प्रकार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या प्रकाराने शिंदे शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते बिथरले आहेत.
