डोंबिवली – रुग्ण सेवेबरोबर ज्ञानदान, सामाजिक कार्यात अखंडपणे कार्यरत असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ डाॅक्टर श्रीराम कुलकर्णी यांचे सोमवारी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डाॅ. अमित कुलकर्णी, सून डाॅ. उज्ज्वला, विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या भावनेतून डाॅ. श्रीराम कुलकर्णी मागील साठ वर्ष डोंबिवलीत रुग्ण सेवा केली. १९ एप्रिल १९३७ मध्ये डाॅ. कुलकर्णी यांचा पंढरपूर येथे जन्म झाला. शिक्षणानंतर व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंब डोंंबिवलीत स्थायिक झाले. वैद्यकीय व्यवसायातील असुनही डाॅ. कुलकर्णी नित्यनियमाने ज्ञानेश्वरीचे पारायण करत होते. ज्ञानेश्वरातील वचनाप्रमाणे ते जीवनाची वाटचाल करत होते.
देश, समाजाच्या विकासासाठी दुर्बल, गरीब, दुर्गम भागातील समाज, त्यांची मुले पुढे आली पाहिजेत हा त्यांचा दूर दृष्टीकोन होता. या भागातील रहिवाशांचे आरोग्य चांगले असे पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील होते. यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह आदिवासी, दुर्गम भागात नियमित प्रौढ शिक्षण वर्ग, संस्कर वर्ग, आरोग्य शिबिरे घेत होते. हा त्यांचा नित्यक्रम होता.
भारत पाकिस्तान युध्दाच्यावेळी युध्दात जखमी झालेल्या सैनिकांसाठी त्यांनी काम केले. किल्लारी, भूज येथील भूकंपाच्यावेळी त्यांनी या भागात ठाण मांडून जखमी, पीडितांना मोफत वैद्यकीय सेवा केली. सण, उत्सवाच्या काळात परिसरातील लोकांनी एकत्र यावे या विचारातून डाॅ. कुलकर्णी यांनी रामनगर गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. पसायदानाचा ते अखंड जप करत होते.
डोंबिवलीतील अनेक कुटुंबीयांचे ते कौटुंबिक डाॅक्टर होते. गड, किल्ले भ्रमंतीची त्यांना आवड होती. डोंबिवली गिर्यारोहण संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या साहसी वृत्तीमधून वयाच्या ६५ व्या वर्षी डाॅ. कुलकर्णी यांनी कैलास मानस सरोवरची यात्रा केली. वरदानंद भारती उर्फ आप्पा यांच्याशी त्यांचे स्नेहबंध होते. पत्नीच्या निधनाने काही काळ ते अस्वस्थ होते. पण रुग्णसेवा आणि अखंड समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ला सावरले.
वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल त्यांना डोंबिवलीतील ब्राह्मण समाज संस्थेतर्फे धन्वंतरी पुस्कार देऊन गौरविण्यात आले होते. डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. अनेक संस्थांचे ते मार्गदर्शक, दाते होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते रुग्ण सेवेबरोबर सामाजिक सेवा, ज्ञानदानाचे काम करत होते.