डोंबिवली : डोंबिवली जवळील ठाकुर्ली, चोळेगाव, खंबाळपाडा, पंचायत बावडी परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, पदपथ अडवून उभारलेले निवारे, टपऱ्या, हातगाड्या, ठेले, खुराडे, गॅरेज, बेकायदा बाजारांवर फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सलग दोन दिवस कारवाई करून या भागातील शंभरहून अधिक अतिक्रमणे भुईसपाट केली.
ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, चोळेगाव परिसराचे नागरीकरण झाले आहे. या भागातील रस्ते, पदपथांवरील वर्दळ वाढली आहे. कल्याण, डोंबिवली शहरांमधील मधला मार्ग म्हणून ठाकुर्ली, चोळे गावचा प्रवासी वाहनाने वापर करतात. ठाकुर्ली, चोळे, खंबाळपाडा, भोईरवाडी, ९० फुटी रस्ता भागातील व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर पावसाची झड दुकानात येऊ नये म्हणून दुकानाच्या समोर निवारे बांधले होते.
चोळे गाव हद्दीत रस्तोरस्ती मटण विक्री दुकानांचे मंच पदपथ, रस्ते अडवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना, शाळकरी मुले, पालकांना पदपथाचा वापर करणे मुश्किल झाले होते. ९० फुटी रस्ता, चोळेगाव भागातील मोकळ्या जागांमध्ये ढाबे सुरू करण्यात आले होते. काही ठिकाणी बेकायदा भाजीपाला बाजार भरवून तेथे निवारे उभारण्यात आले होते. वाहन दुरूस्तीच्या कार्यशाळा रस्त्यावर सुरू होत्या.
९० फुटी रस्ता भागात काही फेरीवाल्यांनी मुख्य वर्दळीच्या पदपथावर ठेले, मंच उभे केले होते. पदपथावर कपाटे, खुर्च्या असे जुने सामान पदपथावर आणून ठेवण्यात आले होते. पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नव्हता. परिसरात बेकायदा फलक लावून परिसराचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. या वाढत्या अतिक्रमणांविषयी फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी फेरीवाला हटाव पथक, जेसीबी यांच्या साहाय्याने दोन दिवसांच्या कालावधीत ठाकुर्ली, चोळेगाव, खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता भागातील १०० हून अधिक बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
टपऱ्या, खुराडे जप्त करण्यात आले. शहर विद्रुप केलेले ९० बेकायदा फलक काढण्यात आले. १४ हातगाड्या, टपऱ्या जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्या. दुकानदारांनी दुकानासमोर बांधलेले २५ हून अधिक निवारे तोडण्यात आले. गॅरेज आणि तेथील सामान तोडून टाकण्यात आले. अचानकच्या या कारवाईने विक्रेत्यांची पळापळ झाली. ठाकुर्ली, चोळे भागातील अतिक्रमणे काढून टाकण्यात आल्याने हा परिसर आता रस्ते, प्रवासी वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.
या भागातील ही कारवाई आठवड्यातून दोन ते तीन वेळा केली जाणार आहे. जे व्यावसायिक कारवाई करूनही पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.