डोंबिवली – डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिराच्या ३५० विद्यार्थ्यांनी दुर्गोत्सव साजरा करण्याचे औचित्य साधून गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत मेहनत, कष्ट करून महाराष्ट्राच्या विविध भागातील ३२ किल्ल्यांच्या दगड, मातींचा वापर करून आकर्षक प्रतिकृती उभ्या केल्या आहेत. डोंंबिवली पूर्वेतील टिळकनगर मधील टिळकनगर शाळेच्या आवारात या प्रतिकृती भाऊबिजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापन मंडळ, शिक्षक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.

अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना किल्ले म्हणजे काय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गड किल्ल्यांची कोणतीही अत्याधुनिक साधने नसताना कशी उभारणी केली. याचीही माहिती विद्यार्थ्यांना मिळावी. चिखल, मातीत हात माखविण्याचा एक वेगळा आनंद असतो. तोही आनंद ही किल्ले बांधणी करताना विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशातून टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गेल्या वर्षापासून दुर्गाेत्सव साजरा केला जातो. राज्याच्या विविध भागातील किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी उभारल्या आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांनी फारसे न ऐकलेले, न पाहिलेले किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत.

किल्ले बांधणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक दृष्ट्या किल्ला कसा बनवावा याविषयी ट्रेक क्षितिज सदस्यांकडून अमोल पोवळे आणि सहकाऱ्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. टिळकनगर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य गुरुकुल आणि टिळकनगर वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण ३२ किल्ले उभारले. या किल्ल्यांमध्ये धोडप, सुमारगड, भीमगड, कंकराळा, पिसोळगड, महिमानगड, केंजळगड, लहुगड, नगरधन, अंबागड असे एकूण ३२ किल्ले आहेत.

ट्रेक क्षितिज संस्थेच्या प्रिया कराडकर आणि सहकाऱ्यांनी किल्ल्यांचे परीक्षण केले. या स्पर्धेत पाचवी ते सातवी विभागातून प्रथम क्रमांक पटकावला कोरलारई किल्ला सातवी बने, द्वितीय क्रमांक मिळाला मंचना कांचना ६वी ब आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला पांडवगड ७वी ड.

आठवी ते दहावी या गटात प्रथम क्रमांकवर दहावी ड चा सुरगड, द्वितीय क्रमांक १०वी क चा भरतगड आणि तृतीय क्रमांक मिळाला आठवी बच्या भूषणगडाला. महाविद्यालयीन गटात टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या एस. वाय. बी.कॉमच्या धर्मापुरी गडाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी कलेच्या सुमारगडाला मिळाला.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडून किल्ले उभारणीसाठी लागणारी दगड, माती पुरवली. परतीच्या पावसाने किल्ले बघण्यासाठी हजेरी लावली तर त्याची किल्ल्यांना दृष्ट लागू नये म्हणून किल्ला सुरक्षितपणे झाकून ठेवण्यासाठी मेनकापड देखील पुरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत सर्व आस्थापनांचे शिक्षक, आस्थापनांचे प्राचार्य, उपप्रचार्य, पर्यवेक्षक, संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. नागरिकांनी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.