डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रम (केडीएमटी), खासगी कंपन्यांचे बस चालक डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रोडवर बाजीप्रभू चौकातील बस थांबा येण्यापूर्वीच बस चिमणी गल्लीच्या प्रवेशद्वारावर थांबवितात. याठिकाणी बस थांबली की बसमधील प्रवासी, कंपनी कर्मचारी थांबा नसताना उतरतात.

एका पाठोपाठ बस बापूसाहेब फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर थांबल्या की दररोज फडके रोडवर वाहनांच्या रांगा लागतात. ही वाहन गर्दी रोखण्यासाठी चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर केडीएमटी, खासगी कंपनी बस चालकांनी बस न थांबविण्याच्या सूचना डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केडीएमटी प्रशासन, खासगी बस चालकांना केल्या आहेत.

शहरांच्या विविध भागातून येणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिका परिवहन विभागाच्या बससाठी डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात बस थांबा आहे याठिकाणीच प्रवाशांनी उतरणे अपेेक्षित आहे. परंतु, अनेक वेळा बाजीप्रभू चौकात खासगी बस, केडीएमटी बसच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे केडीएमटीच्या बससह रिक्षा, मोटारी, दुचाकी ही सर्व प्रकारची वाहने फडके रस्त्यावर खोळंंबून राहतात. अनेक वेळा केडीएमटीचे बस चालक बाजीप्रभू चौकात वाहनांच्या रांगात आहेत म्हणून फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीच्या प्रवेशद्वारावर बस थांबवितात.

बसमधील प्रवासी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक जवळच असल्याने बसमधून उतरण्यास सुरूवात करतात. लोकल पकडण्याची घाई असलेले प्रवासी बसमधून उतरू लागले की बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेले प्रवासीही बसमधून उतरू लागतात. त्यामुळे बस चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर खोळंबून राहते. या बसच्या पाठीमागे इतर वाहनांच्या रांगा लागतात. अशाच पध्दतीने कंपनी कर्मचारी घेऊन येणाऱ्या बस, इतर खासगी वाहनांमधील बस चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर थांबविल्या जातात आणि प्रवासी उतरून रेल्वे स्थानकात किंवा बाजारपेठेत खरेदीसाठी जातात.

या दररोजच्या प्रकारामुळे चिमणी गल्लीतून फडके रस्त्याकडे येणारी रिक्षा, दुचाकी इतर वाहने अडकून पडतात. फडके रस्त्यावर, चिमणी गल्लीत वाहतूक कोंडी होते. या दररोजच्या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढते. डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केडीएमटी वाहतूक विभागाचे नियंत्रक यांना आपल्या बस चालकांना फडके रोडवरील चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर बस न थांबविण्याच्या आणि तेथे प्रवासी न उतरविण्याच्या सूचना केल्या आहेत. अशाच सूचना खासगी कंपन्यांच्या बस चालकांना करण्यात आल्या आहेत.

या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे दररोज फडके रस्ता, के. बि. विरा शाळा, आगरकर छेद रस्त्याने फडके रस्त्यावर येणारी वाहने झटपट आता इच्छित स्थळी निघून जात आहेत. चिमणी गल्लीच्या प्रवेशद्वार, फडके रस्ता, बाजीप्रभू चौक भागात या नियोजनासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.