डोंबिवली – दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी दुपारी डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बँकेचे मुख्यालय ते सर्व शाखांसमोर कर्मचाऱ्यांनी दहशतवादी हल्ल्याचे निषेध फलक घेऊन हल्ल्याचा निषेध केला.

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक ते अधिकारी, कर्मचारी, सेवक वर्ग या निषेध आंदोलनात सहभागी झाला होता. बँँक ग्राहक सेवेला या निषेध कार्यक्रमाची झळ पोहचणार नाही म्हणून भोजनाच्या दुपारच्या वेळेत भर रखरखीत उन्हात हा निषेध कार्यक्रम घेण्यात आला.

डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याणमधील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या शाखांंमधील, केंद्रीय कार्यालयांमधील महिला, पुरूष कर्मचारी, अधिकारी, वरिष्ठ या निषेध कार्यक्रमात सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा एका रांगेत उभे राहून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा पध्दतीने हे निषेध आंदोलन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले. हे क्रूरकृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांना भारताने वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देऊन त्यांचा बिमोड केला आहे. त्यामुळे पहलगाम येथील हल्ल्याचा भारत तेवढ्याच ताकदीने बिमोड करेल आणि या हल्ल्याला भारत कधीही विसरणार नाही, असा संदेश या निषेध कार्यक्रमातून देण्यात आला. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या मृत पर्यटकांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.