डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात साथआजारांबरोबर डेंग्युचा विळखा वाढत चालला आहे. दैनंदिन जंतुनाशक फवारणी होण्या बरोबर उघड्यांवरील खाद्य पदार्थ विक्री बंद होणे आवश्यक आहे. अनेक भागात प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी वडापाव, पाणी पुरी, चायनिज हातगाड्या आपल्या प्रभागातून बंद केल्या आहेत. परंतु, डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग क्षेत्रात संध्याकाळी चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत चायनिज, वडापाव हातगाड्यांचा सुळसुळाट झाला आहे.
मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये पालिका आरोग्य कर्मचारी, ह प्रभाग फेरीवाला हटाव पथकांच्या समोर या चायनिज, वडापाव विक्रीच्या हातगाड्या सुरू आहेत. यासंदर्भात कोणी पालिकेच्या ह प्रभागात तक्रार केली की फेरीवाला हटाव पथकातील कामगार तातडीने त्या रस्ते, चौक भागात जाऊन तक्रारादाराचे नाव जाहीर करून तेथील व्यवसाय बंद करण्यास सांगत आहेत. फेरीवाला हटाव पथकातील कामगारांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे ह प्रभाग हद्दीतील कोणीही नागरिक या चायनिज, वडापाव, पाणीपुरी गाड्यांच्या तक्रारी करण्यास कोणी पुढाकार घेत नसल्याचे समजते.
डोंबिवली पश्चिमेतील शांताराम कुंडलिक म्हात्रे चौक, महात्मा फुले रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता, सम्राट चौक, सुभाष रस्ता भागात, राजूनगर, गरीबाचापाडा, देवीचापाडा, गणेशनगर, मोठागाव रेतीबंदर चौक भागात या चायनिज गाड्यांचा सुळसुळाट आहे. काही ठिकाणी या चायनिज गाड्या, तेथील गर्दी, त्या भोवतीची वाहने यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. सम्राट चौकात हे चित्र आहे.
यापूर्वी जून महिना सुरू झाल्यानंतर पावसाळचे चार महिने उघड्यावर एकही खाद्य पदार्थ विकला जाणार नाही. नागरिकांना अपाय होणार नाही याची काळजी पालिकेकडून घेतली जात होती. चोरून कोणीही अशाप्रकारे व्यवसाय केला तर त्याच्यावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जात होती. पण आता आरोग्य विभागाचे नियंत्रण सुटले आहे. प्रभागात ठराविक कामगार, अधिकाऱ्यांची मक्तेदारी असल्यामुळे उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या, चायनिज विक्रेत्यांच्या कितीही तक्रारी पालिकेत आल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही, असे तक्रारदार नागरिक सांगतात.
डोंबिवली पश्चिमेतील बकालपणा पाहण्यासाठी आयुक्तांनी एक दिवस संध्याकाळच्या वेळेत ह प्रभाग हद्दीला भेट द्यावी आणि खाडी किनारी सुरू असलेल्या बेकायदा चाळी पाहण्यासाठी सकाळच्या वेळेत भेट देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.
ई प्रभागात के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय समोरील रस्त्यावर संध्याकाळी चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पाणीपुरी, भेळपुरी, आईसक्रिम, वडापाव,चायनिज विक्री करणारे साठ हातगाड्या चालक महाविद्यालयासमोरील रस्ता दोन्ही बाजुने बंद करतात. या रस्त्यावर दररोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होते.