डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीसह पूर्वेतील अनेक भागात महानगर गॅसचा घरगुती गॅस पुरवठा सुरू झाला आहे. डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी सोसायट्यांमध्ये महानगर गॅस कंपनीकडून गॅस पुरवठ्याच्या वाहिका टाकून झाल्या आहेत. पूर्व भागातून डोंबिवली पश्चिमेत रेल्वे मार्गाखालून महानगरची भूमिगत गॅस वाहिका टाकण्यात यश आले आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेत एका गृहनिर्माण सोसायटीत महानगरचा गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित सोसायट्यांना हा पुरवठा सुरू केला जाणार आहे.
डोंबिवली पश्चिमेत महानगरचा घरगुती गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत. डोंबिवली पश्चिमेत पूर्व भागातून रेल्वे मार्गाखालून भूमिगत गॅस वाहिका टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर गॅस वाहिका गेलेल्या भागातील सोसायट्यांमधील घरगुती गॅसचा पुरवठा महानगरने सुरू करावा यासाठी खासदार डाॅक्टर शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. डोंबिवली पश्चिमेत सुरळीत महानगरचा घरगुती गॅस पुरवठा होऊ शकतो याची खात्री पटल्यावर श्रीकर कृपा सोसायटीत आमदार राजेश मोरे, भाजपच्या माजी नगरसेविका मनीषा धात्रक, शिंदे शिवसेनेचे शहर सचिव संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत गॅस पुरवठा सुरू करण्यात आला. यावेळी शिंदे शिवसेनेच्या संपर्क संघटक कविता गावंड, पश्चिम शहर संघटक केतकी पोवार, उपजिल्हा संघटक किरण मोंडकर, पूर्व संघटक स्वाती हिरवे, युवा सेनेचे राहुल म्हात्रे, परिवहन समितीचे माजी सदस्य संजय पावशे, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
डोंबिवली पूर्व भागातून पश्चिमेत महानगरची गॅस वाहिका आणण्यासाठी रेल्वे मार्गाचा अडथळा होता. रेल्वे मार्गाखालून भूमिगत गॅस वाहिका आणण्यासाठी वरिष्ठ रेल्वे प्रशासनाची परवानगी आवश्यक होती. खासदार डाॅ. शिंदे यांनी या परवानगीसाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसी संपर्क साधला आणि ही परवानगी मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
डोंबिवली पूर्व ते पश्चिम रेल्वे मार्गाखालून गॅस वाहिका टाकण्याचे काम महानगर गॅसकडून पूर्ण झाल्यानंतर तातडीने डोंबिवली पश्चिमेतील श्रीकर कृपा सोसायटीत प्रायोगिक तत्वावर घरगुती गॅस पुरवठा सुरू करण्यात आला. हे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच काम हाती घेऊन उर्वरित भागाचा घरगुती गॅस पुरवठा सुरू केला जाणार आहे, असे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. श्रीकर कृपा सोसायटीतील घरात महानगरचा गॅस पुरवठा सुरू होताच उपस्थितांनी जल्लोष केला.
गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीत अंबरनाथ ते कळवा या कल्याण लोकसभा मतदारसंघातील बहुतांशी भागात महानगरचा घरगुती गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक घर महानगरच्या घरगुती गॅस पुरवठ्याने जोडले जावे यासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत.