पालिका क्षेत्रात दोन दिवसांत २,०३० रुग्ण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत करोनाचे २,०३० करोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील घोडबंदर भागासह सर्वच भागांमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. घोडबंदर परिसरातील नव्या नागरी वस्त्या तसेच उच्चभ्रू वसाहतींमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

गेल्या आठवड्यभरापासून ठाणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असताना करोना रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी ठाणे शहरात १,३३२ करोना रुग्ण आढळून आले होते. तर सोमवारी ६९८ करोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सुमारे दुपटीने रुग्णसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील माजिवडा मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे आणि कळवा या प्रभागात रुग्णसंख्याही सर्वाधिक आहे. माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात घोडबंदर परिसर, कोलशेत, बाळकुम, माजिवडा हा भाग येतो. या भागात मंगळवारी एकाच दिवसात तब्बल ५१९ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी २९५ करोना रुग्ण या क्षेत्रात आढळून आले होते. घोडबंदरप्रमाणे वर्तकनगर भागातही रुग्णसंख्येचा आलेखही चढाच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत या भागात ३११ करोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी यातील बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत.

कळवा, मुंब्रा, दिव्यातही बाधित

गेल्या दोन दिवसांत प्रत्येक प्रभागात रुग्णसंख्या सुमारे दुप्पट किंवा त्याहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. माजिवडा प्रभाग समितीमध्ये सोमवारी २९५ करोना रुग्ण आढळून आले होते. तर मंगळवारी ५१९ रुग्ण आढळून आले. लोकमान्यनगर प्रभागात सोमवारी ४६ तर मंगळवारी ९८, नौपाडा-कोपरी क्षेत्रात सोमवारी ५१ तर मंगळवारी ९९, उथळसर प्रभाग क्षेत्रात सोमवारी ८४ तर मंगळवारी १७३, वागळे इस्टेट भागात सोमवारी ३५ तर मंगळवारी ८७, कळवा क्षेत्रात सोमवारी २३ आणि मंगळवारी ९५, मुंब्रा सोमवारी नऊ तर मंगळवारी २४, दिवा क्षेत्रात सोमवारी १६ आणि मंगळवारी ३५ करोना बाधित रुग्ण आढळून आले.

३४९ जण उपचाराधीन

ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३,९९४ करोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी करोना रुग्णालय आणि करोना आरोग्य केंद्रात ३४९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर करोना काळजी केंद्रात ४५ करोना रुग्ण उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभागात ४६, व्हेंटिलेटर खाटांवर १५ आणि प्राणवायूंच्या खाटांवर ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शहरात ९५. ८४ टक्के आहे.