अंबरनाथः राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मंगळवारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील त्यांचे खंदे समर्थक आमदार डॉ. बालाजी किणीकरही सोमवारी रात्रीपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. किणीकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. किणीकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

ठाणे जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्काबाहेर जाण्याने राजकीय तर्कवितर्कांना विधान आले आहे. विशेष म्हणजे त्यांचे समर्थक आमदारही संपर्काबाहेर गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकरही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. सोमवारी रात्रीपासून त्यांच्यासी संपर्क होऊ शकलेला नाही, असे निकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्यामुळे डॉ. किणीकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असल्याची शक्यता अधिक आहे. खबरदारी म्हणून डॉ. किणीकर यांच्या घराबाहेर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी स्थानिक सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांच्यासह मंगळवारी पाहणी केली. डॉ. किणीकर अंबरनाथ पूर्वेतील बी केबीन रस्त्यावरील निसर्ग ग्रीन या सोसायटीमध्ये राहतात.

शिंदेच्या आशिर्वादाने तिसऱ्यांदा आमदार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारणापासून दूर असलेले आणि पेशाने डॉक्टर असलेले डॉ. बालाजी किणीकर 2009 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा नवा चेहरा म्हणून विधासभेत गेले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा होता. मात्र त्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकीत डॉ. किणीकर यांना पक्षातील एका गटाने अप्रत्यक्ष विरोध केला होता. त्यानंतरही डॉ. किणीकर मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांच्या विजयामागे एकनाथ शिंदे आणि स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली डॉ. किणीकर काम करत आहेत. अगदी साधी राहणी असलेले डॉ. किणीकर त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारख्या वागण्यामुळे मतदारसंघात परिचीत आहेत.