ठाणे: राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणाऱ्या अनेक भेट गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाल्या. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बंधू राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. अनेक वर्षांनंतर हे दोन्ही कुटुंब एकाच फोटोमध्ये दिसले. त्यानंतर संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले. मात्र त्याच्या काही मिनिटातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या दोन भेटीने अनेक चर्चा रंगल्या. मात्र यातच आणखी एक भेट चर्चेचा विषय ठरली.
दिल्लीहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावून भाजपचे नेते सुनील देवधर यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेऊन आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंचे विश्वासू आणि कुटुंबातीलच एक भाग असलेले विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.
या भेटीने केवळ स्थानिकच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. नार्वेकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील महत्त्वाचे रणनीतिकार मानले जातात. तर डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत. ते शिवसेनेचे संसदीय गटनेते आहेत. त्यामुळे या अनपेक्षित भेटीमागील कारणांबद्दल अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांनी ही भेट पूर्णपणे सामाजिक आणि धार्मिक कारणासाठी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ठाकरे गट आणि शिंदे गटातील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटी दरम्यान काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र ठाकरेंच्या निर्णयात नार्वेकर यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे काहीतरी चर्चा झालीच असावी असा कयास बांधला जातो आहे. या गणपती दर्शन भेटीबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांनी या भेटीवर भाष्य करण्याचे टाळले असले, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या या भेटीला काही अर्थ नक्कीच असू शकतील.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भेट साधी शुभेच्छा देण्यासाठी असली तरी तिचा राजकीय अर्थ काढण्याची सवय महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे, असे अनेकांनी सोशल मीडियावरही नमूद केले आहे.