लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: गेल्या महिन्यात पावसाने २५ दिवस दडी मारली होती. त्यावेळी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे हाती घेण्याऐवजी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन गप्पगार बसले. आता गणेशोत्सावाच्या तोंडावर रस्ते सुस्थितीत आणि खड्डे बुजविण्याची कामे सुरू केल्यावर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खड्डे बुजविताना ठेकेदाराला कसरत करावी लागते. या कसरतीत शहरांमधील रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. या खड्ड्यांमधून गणपती बाप्पांना प्रवास करावा लागणार आहे.

डोंबिवली, कल्याणमध्ये खड्डे बुजविण्याची कामे खडी आणि सिमेंट, मातीचा गिलावा टाकून करण्यात येत आहेत. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून ओलावा रस्त्यावर आला आहे. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे खड्ड्यातील खडी रस्त्यावर पसरली आहे. या खडीवरुन दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी डोंबिवली, कल्याण शहरातील रस्ते सुस्थितीत करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. पावसामुळे त्या आश्वासनावर पाणी फिरले आहे.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवली पालिकेत भाजपचाच महापौर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं विधान

रस्तोरस्ती पालिकेचे ठेकेदार, अभियंते खड्डे सुस्थितीत करण्यासाठी, खड्डे भरणीसाठी उभे आहेत. परंतु, पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असल्याने ठेकेदार, अभियंत्यांची तारांबळ उडत आहे.

टिटवाळ्यात भर पावसात डांबर टाकून खड्डे भरणीची कामे सुरू होती. ही डांबर काही क्षणात तुंबलेल्या पाण्यावर तरंगत होती. या डांबरमध्ये तेलाचा तवंग आढळून आला. पावसात अशी निकृष्ट दर्जाची कामे करुन तुम्ही नागरिकांचा पैसा का पाण्यात घालता, असा प्रश्न टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी उपस्थित करुन हे काम ठेकेदाराला थांबविण्यास सांगितले. डांबरीने खड्डे भरणीची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली जात आहेत, असे देशेकर यांनी सांगितले.

हेही वाचा… डोंबिवली, कल्याणमधील बाजार गजबजले, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खड्डे भरणीची कामे करणाऱ्या बहुतांशी मूळ ठेकेदारांनी उपठेकेदारांना कामे दिली आहेत. हे ठेकेदार शहरातील स्थानकि आहेत. पाऊस सुरू असल्याने ठेकेदारांचे डांबर निर्मिती, साठवण प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे मिळेल तेथून निकृष्ट दर्जाची डांबर आणून रस्त्यावर ओतली जात आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

गणपती विसर्जन घाट, विसर्जन मार्गावरील खड्डे फक्त भरण्यात आले आहेत. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याचे चित्र आहे. शहर अभियंता विभागाचा वचक नसल्याने ठेकेदार मनमानी आणि अधिकारी सुशेगात असल्याचे चित्र आहे.