ठाणे: ठाणे- नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होऊन ठाणे-बेलापूर मार्गावर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सिडको बस थांबा ते दिघा पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे रेल्वेसेवा टाळत रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागत होता. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. रेल्वे आणि रस्ते अशा दुहेरी कोंडीत नागरिक अडकले आहेत.
शुक्रवारी पहाटे ट्रान्स हार्बर मार्गावर ‘एमएमआरडीए’ने ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर बसविण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत ब्लॉक घेतला होता. हे गर्डर तिरके झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक सकाळी ७.१० वाजल्यापासून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्याचा परिणाम आता नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अनेकांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडको बसगाड्यांच्या थांब्यावरून नवी मुंबईत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परंतु या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांचा भार आला आहे. त्यामुळे ठाणे बेलापूर मार्गावरील सिडको बस थांबा, कळवा नाका, दिघा या ठिकाणी मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे बसगाड्या देखील पोहचू शकत नाहीत.
अनेकजण तासन -तास बसगाड्यांमध्ये बसून आहेत. काही बसगाड्या बस थांब्यावर उभे असलेल्या प्रवाशांना आत प्रवेश देत नव्हते. प्रवाशांकडून ऑनलाईन वाहतुक सेवा देणाऱ्या ओला, उबर, रॅपिडोचा पर्याय निवडला जात आहे. परंतु वाहतुक कोंडीमुळे त्यांच्याकडूनही प्रवाशांना टाळले जात आहे. काहींना पायी प्रवास करण्याची वेळ आली. ऐन उन्हात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काही रिक्षा चालकांनी नवी मुंबईत जाण्यासाठी अधिकच्या पैशांची मागणी केली.