कल्याण – कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी बाह्यवळण आणि परिसरातील रस्त्यावर गुरूवारी दुपारपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा फटका कल्याण शहरांतर्गत वाहतुकीला बसला आहे. भिवंडी कोन ते गोविंदवाडी या पाच मिनिटाच्या प्रवासासाठी प्रवाशांना ४५ मिनिटे लागत आहेत.
भिवंडी, पडघा भागातून येणारी आणि कल्याण, डोंबिवली, शिळफाटा भागातून भिवंडी, नाशिककडे जाणारी वाहने या कोंडीत अडकली आहेत. शाळेच्या बसना या कोंडीचा फटका बसला. कोंडीमुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. दुर्गाडी येथे दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे. दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्त्यांवर नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. स्वागत कमानी, शुभेच्छा कमानी उभारणीची कामे सुरू आहेत. या कामासाठीचे सामान रस्त्याच्या बाजुला आणून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची रूंदी सामानांमुळे कमी झाली आहे. एकावेळी एकाच मार्गिकेतून जाणारी वाहने आता दुर्गाडी किल्ला पायथा भागात एक मार्गिकेतून धावत आहेत. मागील अनेक वर्षाच्या काळात दुर्गाडी किल्ला भागात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली की या भागात वाहतूक कोंडी होते.
गुरूवारी सकाळपासून दुर्गाडी किल्ला भागात वाहतूक कोंडीला सुरूवात झाली. भिवंडीकडून कोनमार्गे उड्डाण पुलावरून येणारी वाहने दुर्गाडी चौकात अडकली. मुरबाड, पडघा आधारवाडी येणारी वाहने, कल्याण शहरातून भिवंडी, नाशिक, मुंबईकडे जाणारी वाहने या कोंडीत अडकून पडली. वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत कल्याणमध्ये वाहतूक पोलीस बळ पुरेसे आहे. रस्तोरस्ती कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांचा दमछाक होत आहे. दुर्गाडी चौकातील कोंडी वाढत असतानाच कल्याण शहरातील वाहतूक कोंडीवर त्याचा परिणाम झाला. गोविंदवाडी रस्ता, शिवाजी चौक, लालचौकीमार्गे दुर्गाडी पुलाकडे येणारी वाहने जागोजागी अडकून पडली.
त्यामुळे कल्याण शहरात वाहतुकीच्या रांगा लागल्या. भिवंडी कोन भागातून गोविंदवाडी मार्गे पत्रीपूल येथे जाण्यासाठी पाच मिनिटाचा अवधी लागतो. तसेच दुर्गाडी पुलाकडून कल्याण रेल्वे स्थानक भागात जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. याच अंतरासाठी गुरूवारी दुपारपासून ४० ते ४५ मिनिटे वेळ लागत होता. दुर्गाडीकडून गोविंदवाडी वळण रस्तामार्गे पत्रीपूलकडे जाणारी आणि येणारी वाहने या रस्त्यावर अडकून पडली होती.
ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली होती. अनेक वेळा वाहतूक कोंडी होईल याची जाणीव असुनही वाहतूक पोलीस सुरूवातील बघ्याची भूमिका घेतात आणि एकदा रस्ते जाम झाले की मग कोंडी सोडविण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात, अशा तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या.
दुपारी सुरू झालेली कल्याण शहरातील वाहतूक कोंडी संध्याकाळपर्यंत सुरू होती. दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव सुरू झाला की अनेक भाविक याठिकाणी वाहने घेऊन दर्शनासाठी येतात. त्यांची वाहने दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी रस्त्यावर उभी केली जातात. त्यात किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अलटो गर्दी त्यामुळे नवरात्रोत्सव काळात या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी असते. या भागातील रस्ते नऊ दिवसाच्या काळात वाहतूक विभागाकडून संध्याकाळी बंद केले जातात.