ठाणे : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले. याठिकाणी दोन्ही गटाने एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद निवळला.

‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशी ठाण्याची ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असून या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. यामुळे या मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे कुटुंबीय असा सामना रंगला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना

हेही वाचा – दिघे साहेबांची प्रतिमा फाडण्याचे धाडस होते कसे ? केदार दिघे यांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे २४ वर्षांपूर्वी निधन झाले. परंतु आजही प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाने प्रचार होतो आणि त्याचा फायदा शिवसेनेला होतो, हे आजवर दिसून आलेले आहे. दिघे नावाचा करिष्मा लक्षात घेऊन ठाकरे गटाने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटाकडून मात्र कोणत्याही वादाविना प्रचार सुरू असतानाच, निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी दोन्ही गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले. कोपरी येथील अष्टविनायक चौकात शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी दुचाकी रॅलीसाठी जमले होते. त्याचदरम्यान, ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांची दुचाकी रॅली येथून जात होती. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. केदार दिघे आगे बडो..आयेगी तो मशालही, अशा घोषणा ठाकरे गटाकडून देण्यात येत होत्या. तर, एकनाथ शिंदे आगे बडो…हम तुम्हारे साथ है, आयेगा तो धनुष्यबाणही अशा घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात येत होत्या. घोषणाबाजीमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांना बाजूला करत ठाकरे गटाच्या रॅलीला पुढे जाण्याच्या सूचना केल्या. यामुळे हा वाद निवळला.