कल्याण : ठाणे ते कल्याण २० किलोमीटरच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर कशासाठी, असा सवाल करत मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शनिवारी रात्री समाजमाध्यमावर टीका केली. या टीकेनंतर शिंदे यांना समाजमाध्यमांवरील जनरोषाला सामोरे जावे लागल्याने त्यांनी रविवारी सकाळचा आपला हेलिकॉप्टर दौराच रद्द केल्याचे समजते. मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर दौरा रद्द करण्यात आल्याचे कारण यामागे देण्यात आले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथील रेमंड हेलिपॅडवरून शिळफाटा रस्त्यावरील पलावा हेलिपॅडवर येणार होते. तेथून ते कल्याणला बिर्ला महाविद्यालयातील पालखीत सहभागी होऊन शहाडच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, शिळफाटा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठाणे ते भिवंडी, ठाणे ते मुंब्रा-शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडीने दिवस-रात्र गजबजलेला असतो. प्रवासी या कोंडीने त्रस्त आहेत. या कोंडीवर मार्ग काढण्यास कोणीही स्थानिक शासनकर्ता पुढाकार घेत नाही.

अशा परिस्थितीत पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे ते कल्याण पुन्हा ठाणे असा २० किलोमीटरचा प्रवास हेलिकॉप्टरने करणार असल्याचा सरकारी दौरा शनिवारी संध्याकाळी जाहीर होताच मनसे नेते राजू पाटील यांनी त्यावर सडकून टीका केली. सामान्यांचे कैवारी म्हणविणारे सामान्यांच्या पैशांची उधळपट्टी करत थोड्या अंतरासाठी हेलिकॉप्टर वापरत आहेत, असे टीकास्त्र त्यांनी समाज माध्यमांवरून सोडले. शिळफाटा रस्त्यावरील कोंडी, पलावा चौकातील रखडलेला पूल, काटई – निळजे पलावा पुलाचा केलेला चुथाडा आदी मुद्देही त्यांनी मांडले.

ही टीका जिव्हारी लागल्याने एकनाथ शिंदे गटाने हा हेलिकॉप्टर दौरा मुसळधार पावसाचे कारण देऊन रद्द केला असल्याचे समजते. हा दौरा रद्द करून तो भिवंडी पिसेमागे करण्यात आला होता. पिसे येथील हेलिपॅडवर पालकमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरण्याचा सरकारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र तोही रद्द झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिक माहितीसाठी जिल्हाप्रमुख गोपाळ लांगडे यांच्याशी संपर्क साध्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊन शकला नाही. आमदार राजेश मोरे हे पंढरपूरला वारीसाठी गेले आहेत. एका शासकीय अधिकाऱ्याने मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते मागनि दौरा केल्याचे सांगितले.