ठाणे : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मंगळवारी अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्ताने अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचे शिंदे म्हणाले. ही देशाची संस्कृती नाही. हे कृत्य अशोभनीय आहे. या प्रकाराचा निषेध करत आहोत असेही त्यांनी सांगितले.