Ladki Bahin Yojna / ठाणे : कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. शिवसेना पुरस्कृत साई दर्शन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला बचत गट स्नेहसंमेलन -२०२५’ या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

या महिला बचत गट स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आलो आहे. कारण, लाडक्या बहिणींमुळे सव्वा लाखाच्या लीडने मी निवडून आलो, त्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो. त्यामुळेच मी राज्याचा मुख्यमंत्री पण झालो आणि अडीच वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या राज्याची धुरा मला सांभाळायची संधी मिळाली, असे मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मांडले. ते पुढे म्हणाले महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेतून अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू झाले, महिलांना कुटुंबात मान मिळाला.

महिलांना लखपती बनवण्याचा आमचा मानस असून त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ गरजेची असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही असे सांगताना त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील महायुतीला अशीच साथ द्यावी अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

शहरात अंतर्गत मेट्रोचे काम लवकरच सुरु

गेल्या अडीच वर्षात राज्याचा वेगाने विकास झाला. अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही मार्गी लावल्या. ठाणे शहरात वडाळा ते कासारवडवली दरम्यान मेट्रो मार्ग सुरू होत असून अंतर्गत मेट्रो मार्ग देखील तयार केला जाणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार असून त्याद्वारे हा सर्व भाग मेट्रोनी जोडला जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

किसननगरवासी लवकरच हक्काच्या घरात जाणार

ठाण्यात निवडणुका आल्या की क्लस्टरची चर्चा होते असा आरोप होतो. परंतू, किसननगरसाठी क्लस्टर योजनेला मंजुरी देऊन १८ मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एकेकाळी या योजनेसाठी प्रखर आंदोलन करावे लागले असले, तरीही आता लवकरच किसननगरवासीयांना आपल्या हक्काच्या घरात जाता येणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.