डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी भागात शहराच्या प्रवेशव्दारावरील घारडा सर्कल येथे कल्याण डोंबिवली पालिका आणि खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची घाईघाईत उभारणी करण्यात आली आहे. या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता.१७) संध्याकाळी सात वाजता केले जाणार आहे.

दीड वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची पूर्तता शिवसेनेकडून केली जात आहे. हा पुतळा उभारणीसाठी खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला. कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखाली या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजयभाई देसाई, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित राहणार आहेत. शिवजयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आल्यानंतर मागील दहा दिवसांच्या कालावधीत घाईघाईत एमआयडीसीतील घारडा सर्कल येथील पुतळा उभारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. रात्रंदिवस हे काम सुरू होते.

खासदार शिंदे समर्थक कार्यकर्ते या कामावर लक्ष ठेऊन होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे यांच्या पुढाकारातून या पुतळ्याची उभारणी होत असल्याने त्यात कोणत्याही त्रृटी राहणार नाहीत याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी अत्यावश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. एक कोटी ४४ लाख रूपये खर्चाचे हे पुतळा उभारणीचे काम मुंबईतील बांद्रा येथील मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत शासन अनुदानातून हे काम करण्यात आले आहे. राजकीय पुढाकारातून हे काम होत असल्याने या कामाचे प्रस्ताव पालिकेतील वरिष्ठांना माहितीस्तव सादर करून, बांधकाम विभागाने या पुतळा उभारणीची कार्यवाही केली आहे.

घारडा सर्कल येथे होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन कोळसेवाडी वाहतूक विभागाने यापूर्वीच हे बेट कमी करावे किंवा काढून टाकण्याची सूचना पालिकेला केली होती. त्याचा प्रशासनाने कधीच विचार केला नाही. या वाहतूक बेटाच्या जागेवर अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. हा पुतळा पाहण्यासाठी नागरिकांची दररोज गर्दी जमेल. त्यांना कॅप्टन सचान स्मारक, चौका भोवतीच्या पदपथ, रस्त्यांवर उभे राहून पुतळा पाहणीचे पर्यटन करावे लागणार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा भविष्यातील घरडा सर्कल भागातील वाढती वाहन संख्या आणि कोंडी विचारात घेऊन कॅप्टन सचान स्मारकाच्या बाजुला उभा करण्याची शहरातील जाणत्यांची मागणी होती.