लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: बेकायदा म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने कारवाई केलेल्या, महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून त्या आधारे बेकायदा इमारती उभारणाऱ्या डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील इमारतींना महावितरणच्या अभियंत्यांनी रहिवासी, भूमाफियांच्या मागणीवरुन नियमबाह्य वीज पुरवठा सुरू केला आहे. अशाप्रकारचा वीज पुरवठा करुन महावितरण बेकायदा बांधकामांची पाठराखण करत असल्याची तक्रार येथील एका जागरुक नागरिकाने कल्याण येथील महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेकडून बेकायदा इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून भूमाफिया बिगारी कामगार, नाका कामगार, कल्याण डोंबिवली पालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगार यांना आपल्या इमारतीत रहिवास झाला आहे हे पालिकेला दाखविण्यासाठी भाडे तत्वावर निवारा देतात. या रहिवाशांच्या माध्यमातून बेकायदा इमारतीला वीज पुर‌वठा, पालिकेकडून नळ जोडण्या, मलवाहिन्या टाकण्यासाठीची कामे करून घेतात. या सुविधा मिळाल्या की प्रभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या बेकायदा इमारतींना तात्काळ मालमत्ता कर लावून या इमारती ‘अधिकृत’ असल्याचा देखावा उभा करतात, असे या प्रकरणातील तक्रारदार आणि बेकायदा बांधकामांच्या विरुध्द ९०० दिवसांपासून उपोषण करणारे डोंबिवलीतील महेश निंबाळकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-कल्याणमध्ये घर मालकीणीकडून गृहसेविकेची १४ लाखाची फसवणूक

बेकायदा इमारतीच्या जागेवर चाळी होत्या, असे दाखवून बनावट रहिवासी उभे केले जातात. अशा रहिवाशांचे निवेदन महावितरणला देऊन वीज पुरवठ्याची मागणी केली जाते. असा एक नवीन प्रकार भूमाफियांनी सुरू केला आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात प्रफुल्ल गोरे, सिकंदर नंदयाल, कुलदीप चोप्रा, सिध्देश किर यांनी १० इमारतींचा शिव सावली ३०० घरांचा बेकायदा गृह प्रकल्प उभारणीचे काम सुरू केेले आहे. या इमारतींवर पालिकेचे ह प्रभाग साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी कारवाई केली आहे. पालिकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही बेकायदा इमारतीला वीज पुरवठा देऊ नये, असे आदेश माजी पालिका आयुक्तांनी दोन वर्षापूर्वी महावितरणच्या वरिष्ठांना दिले आहेत. महावितरणचे स्थानिक अधिकारी माफियांशी संगनमत करुन बेकायदा इमारतींना वीज पुरवठा देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कुंभारखाण पाड्यातील शिव सावली प्रकल्पाला वीज पुरवठा देण्याची तयारी महावितरणने सुरू केली आहे. धक्कादायक म्हणजे या बेकायदा गृह प्रकल्पात बहुतांशी पालिकेचे कामगार आहेत. या प्रकरणाची आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

आणखी वाचा-डोंबिवली एमआयडीसीत दुर्गंधीयुक्त रसायन मिश्रित सांडपाणी रस्त्यावर

डोंबिवली पूर्वेतील शीतला मंदिरा जवळील बालाजी मंदिराच्या बाजुला ६५ महारेरा प्रकरणातील एक बेकायदा इमारत, कोपर भागातील सखाराम काॅम्पलेक्सच्या बाजुला बगिचा आरक्षणावर माफियांनी उभारलेल्या दोन इमारती, गरीबाचापाडा येथील अग्निशमन केंद्रासमोरील महारेरा प्रकरणातील एका इमारत, याच इमारतीच्या बाजुला वर्दळीच्या रस्त्यावरील बेकायदा इमारतींमध्ये महावितरणने वीज पुरवठा सुरू केला आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले. देवीचापाडा काळुबाई मंदिराजवळील मुकेश म्हात्रे, जितू म्हात्रे यांच्या इमारतीवर कारवाई करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.

एका लोकप्रतिनिधीचे त्रिकुट डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांना अभय देण्याचे काम करत असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. पालिका, महावितरण अधिकाऱ्यांवर दबाव आणून हे त्रिकुट बेकायदा बांधकामांवर कारवाई होणार नाही याची विशेष काळजी घेत असल्याचे कळते.

“ वीज वापर नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. एखाद्या इमारतीमधील रहिवाशांनी विजेची मागणी केली तर त्यांना विद्युत कायदा कलम ४८ नुसार वीज पुरवठा देणे बंधनकारक आहे. अशी इमारत अनधिकृत असली तरी पालिकेकडून होणाऱ्या कारवाईला अधिन राहून हा वीजपुरवठा देण्यात येतो. तसे हमीपत्र रहिवाशांकडून घेतो. पालिकेने कारवाईचे पत्र दिले तर आम्ही त्या इमारतीचा वीज पुरवठा तोडून टाकतो. ” -दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, महावितरण, कल्याण.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महावितरण अधिकारी रहिवाशांचे नाव पुढे करुन माफियांशी संगनमत करून डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा देत आहेत. आतापर्यंत राजकीय मंडळी, पालिका अधिकारी, नगरसेवक बेकायदा बांधकामांची पाठराखण करत होते. आता महावितरणही त्यात उतरल्याचे दिसते.” -महेश निंबाळकर, तक्रारदार