Navi Mumbai International Airport : ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण प्रकल्पाची घोषणा केली आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवर ताण पडण्याची शक्यता असल्याने ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा तासाचा प्रवास काही मिनीटांवर येण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार आहे. हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाद्वारे दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची सेवा देण्यात येईल. तसेच २०३८ पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ९० दशलक्ष प्रवाशांच्या सेवेचे सरकारचे नियोजन आहे. विमानतळ प्रकल्पाचे महत्व विचारात घेता विमानतळाच्या स्थानिक क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन करणावर आता राज्य सरकाने भर घातली आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर, मिरा भाईंदर, वसई, विरार आणि भिवंडी येथून वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा-शिळफाटा, ठाणे बेलापूर मार्गे नवी मुंबई गाठता येते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध भागांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणे आवश्यक आहे.

वेळेची बचत अशी होईल

सिडकोने ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दरम्यान उन्नत मार्गासाठी सल्लागार म्हणून मे. अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेड या संस्थेव्दारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. हा प्रकल्प सुमारे २५.२ किमी लांबीचा असून सहा- वाहिन्या उन्नत मार्ग केला जाणार आहे. त्यामुळे अंदाजे ४० मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आधीच वाहतुक कोंडी असलेल्या ठाणे बेलापूर मार्गावर सध्याचा तास-दीड तासांचा प्रवास कमी होण्यास मदत होईल.

या मार्गावर सहा प्रमुख इंटरचेंज असतील. ते कोपरी पटणी पूल, घणसोली ऐरोली खाडी पूल, कांजूर मार्ग-कोपर खैरणे जोड मार्गिका, वाशी येथील सायन पनवेल महामार्ग, पाम बीच मार्ग आणि उलवे किनारी मार्ग या प्रमुख मार्गांना जोडतील. सिडकोने उन्नत मार्ग प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता दिली होती. त्यानुषंगाने शासनाने हा प्रकल्प सिडको महामंडळामार्फत राबविण्यास तत्त्वतः मंजूरी दिली. दरम्यान, मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मागील महिन्यात एक बैठक झाली. हा प्रकल्प बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्त्वावर राबविण्याबाबत तसेच या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करुन प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर ३ सप्टेंबरला या प्रकल्पाबाबत शासन निर्णय झाला आहे.

काय आहे निर्णय

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्गासाठी अंदाजित खर्च ६ हजार ३६३ कोटी इतका होणार असून खर्चाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी पीपीपी अंतर्गत बांधा वापरा हस्तांतरित करा टोल मॉडेल सिडको महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. टोल मॉडेल अंतर्गत प्रकल्पास सहाय्य म्हणून ६०% हिस्सा करारधारकर आणि उर्वरित ४०% प्रकल्प बांधकाम खर्चापैकी २०% खर्च राज्य शासनाचा व उर्वरित २०% खर्च, व्यवहार्यता तफावत निधीअंतर्गत केंद्र शासनाकडून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मार्गालगतची अतिरिक्त जमीन व्यावसायिक वापरांसाठी एकत्र जमीन अधिग्रहणाद्वारे किंवा नगर रचना योजनेद्वारे संपादित करण्यास तसेच मार्गीकेखालील शासकीय मालकीची जमीन नाममात्र दराने सिडको महामंडळास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प “महत्वकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आला असून येथे टोल आकारणी होणार आहे.