घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास मंत्र्यांचे उल्हासनगर पालिका आयुक्तांना आदेश

उल्हासनगर: घनकचरा व्यवस्थापनासाठी कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या उल्हासनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. त्यात कचराभूमीच्या जागेचा प्रश्न सुटत नसल्याने अस्तित्वात असलेल्या कचराभूमीला स्थलांतरीत करता येत नसून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आहे. त्यामुळे आधी शहरातील कचऱ्याचे सक्तीने विलगीकरण करून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयमुक्त डॉ. राजा दयानिधी यांना दिले आहेत.

सध्याच्या घडीला कॅम्प पाच भागातील गायकवाड पाडा येथील खदान परिसरात महापालिका कचरा टाकते. तो वर्गीकृत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. स्थानिक नागरिकांनी या कचराभूमीला विरोध केला आहे. पालिकेने तिला स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्य शासनाने अंबरनाथ तालुक्यातील मौजे उसाटणे येथील ३० एकर जमीन देऊ केली आहे. तो प्रस्तावही मार्गी लागत नसल्याने उल्हासनगर शहराची कचराकोंडी होते आहे. अशा परिस्थितीत कचराभूमीचा प्रश्न निकाली काढून दुर्गंधीची समस्या सोडवण्यासाठी सोमवारी नगरविकास मंत्री आणि विभागातील अधिकाऱ्यांसह विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत आधी ओला आणि सुका कचरा वेगळा करा, त्यानंतरच त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा असा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना दिले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट होत असल्याने या प्रश्नावर तोडगा काढणे शक्य झाले. तोच उपाय उल्हासनगर महानगरपालिकेने देखील आपल्या हद्दीत राबवावा असेही यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले. तर कचरा विलगीकरण ही काळाची गरज असून त्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली.

दररोज ३६० मेट्रिक टन कचरा

 उल्हासनगर शहरात दररोज ३६० मेट्रिक टन घनकचरा तयार होतो. यापैकी ओला कचरा सुमारे २०० मेट्रिक टन आहे, तर सुका कचरा १०६ मेट्रिक टन आहे. शहरात कचरा विलगीकरणासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. डिसेंबरनंतर कचराभूमीला आग लागण्याचे प्रकार यामुळेच वाढल्याचे यापूर्वीही समोर आले होते. त्यामुळे कचरा विलगीकरणाला नागरिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.