कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाच शाळांमध्ये यावर्षीपासून अर्ध इंग्रजी शिक्षणाचे (सेमी इंग्रजी) धडे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. महापालिका हद्दीत पालिकेच्या ६८ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे, या शाळांच्या दैनंदिन हालचाली, कामकाज, सुविधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेवर एका पालिका अधिकाऱ्याची पालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. पालिका शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, बूट, मौजे देण्यात येणार आहेत, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले.

पावसाळ्यात एकही शाळा पावसाच्या पाण्याने गळू नये म्हणून आवश्यक ती देखभाल दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शाळांमध्ये आनंददायी वातावरण असावे म्हणून शाळांमध्ये भित्ती चित्रांचे काम केले जात आहे. आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचरचे काम केले जात आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक गुणांक वाढवा म्हणून निपूण योजनेंर्गत प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. पालक अधिकारी नेमून दिलेल्या शाळेत नियमित जाऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेणार आहेत. तसेच, शिक्षकांसोबत आढावा बैठक घेऊन शाळेच्या समस्या, विद्यार्थी गुणवत्ता याचा पाठपुरावा करणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

पावसाळ्याचा विचार करून पालिका मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये हे आपत्कालीन कक्ष कार्यान्वित असणार आहेत. एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची या कक्षात दररोज रात्रपाळीसाठी नेमणूक असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा सज्ज असतील असे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून राष्ट्रीय आपत्कलीन प्रतिबंधित जवानांची एक तुकडी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दाखल झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना साथीच्या वाढत्या रुग्णांचा विचार करून कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात १० खाटा, डोंंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाच खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. याशिवाय करोनाविषयक सर्व चाचण्या पालिकेत केल्या जातील असे नियोजन केले आहे. नागरिकांना काही आजार झाल्यास तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात, नागरी आरोग्य केंद्रात येऊन वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात. कोणत्याही अफवा, चर्चांवर विश्वास ठेऊ नये, असे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होते.